Author Topic: देवमाणूस  (Read 305 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 245
देवमाणूस
« on: July 14, 2018, 10:57:17 PM »
                 देवमाणूस

बाप माझा ‘बाप’ होता, लाखांमध्ये एक होता
देव मला माहित नाही, देवाचा अवतार होता

पाच एप्रिल तारखेला, एकोणीसशे बत्तीस सालाला
वाघूरकाठी सुनसगावला, सुकदेवाचा उदय जाहला

भावाबहिणींच्या सप्तर्षीला, तेजस्वी तारा  उगवला
माय वारा, पिता सदोबा, आवळी अन् जैसे तुकोबा

शिक्षण करण्या गरिबीतून, गाव सोडून शहरी आला
दोन वेळच्या घासांकरिता, कष्ट खाऊन दुःख प्याला

कोल्ह्यांच्या गुही राहुनि, ससा होऊन मान मिळविला
मावशीच्या कडक शिस्तीत, आयुष्याचा घट घडविला

आल्या गेल्या संकटकाळी, मायाममतेचा हात होता
रंंजल्यागांजल्या लेकीसुनांचा, भरवशाचा तात होता

नाही टिळा ना तुळशीमाळा, वारकरी हा दिसे वेगळा
मदत करण्या सदैव सकळा, सौजन्याचा होता पुतळा

शेतीखात्यात काम करुनि, दीन शेतकऱ्यां दिला सहारा
दूरगावच्या शेतकऱ्यांनाही, घरी स्वतःच्या दिला आसरा

नोकरी करुन इमाने इतबारे, वरिष्ठांचा छळ साहिला
कंटाळून मग जुलूमाला, कष्टी मने राजीनामा दिला

सून आणता घरास शोभा, सदैव राहिला पाठी उभा
पुत्रवधू नव्हे पुत्रीच खरी, मुलांहून तिज मान भारी

नातवांना शिकवून सुंदर, शिक्षणाचा पाया रचिला
उंच यशाचा नातवांच्या, आनंदाने कळस पाहिला

वाईट कुणाचेच केले नाही, आपलेही होणार नाही
कष्ट करिता देतो दाता, नेहमी हाच विश्वास होता

स्वकष्टे गरिबीतून वर येऊनि, विसरला नाही तू गरीबाला
भावाबहिणींंचा संसार मांडला, संसार सुखाने स्वतः केला

साध्याभोळ्या पत्नीचा, कधी चुकूुनही ना दुःस्वास केला
मदत करण्यास दुजांना पण, पत्नीशी अविश्वास केला

पाव्हणे रावळे नातीगोती, किती सांभाळले नाही गणती
उपकार तिचे सदा मानुनि, सदाच केली तू अबोल प्रिती

भलेपणा तुमचा तुम्हास नडला, ओळखले ना कुणी तुम्हाला
शंकरासम दूषणाच्या हलाहला, आप्त कल्याणा तुम्ही प्याला

फेब्रुवारीच्या बावीस तारखेला, दोन हजार नऊ सालाला
येऊ नये तो दिन आला, कोमातच नायरला प्राण सोडला

वाईट एवढेच बाबा आम्हां, अंत्य समयी ना भेटलो तुम्हां
भाग्यवान नातवंडे ठरली, अंतिम समयी तुम्हास भेटलीे

डॉक्टर नातीच्या प्रयत्नाला, ना मुला सुनांच्या धावपळीला
यश नाही दिले आम्हा कुणाला, केली घाई जाण्या स्वर्गाला

आम्ही लेकरे तुझीच देवा, नकोच आम्हां कसला हेवा
समृद्ध आयुष्य तुमच्या पायी, अशीच असू दे तव पुण्याई

सजलनयन नभ सदा बरसती, अश्रू आठवणींचे ओघळती
आशिर्वाद तुमचे माणिक मोती, त्याविना ना आम्हास गती

-प्रा.अरुण सु.पाटील (असु)

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
तेरा अधिक दोन किती? (answer in English number):