वाकळ-प्रसन्न मनाची...

Started by Anil S.Raut, November 15, 2014, 01:38:47 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut


बापाचं जुनं धोतर..मायचं फाटकं लुगडं,
दोहोच्या मिलनाचं
घातलं जायचं पाल...
दोन आडव्या-दोन उभ्या धाग्यांनी !
जुन्याच रंगीबेरंगी चिंध्यांनी
सजवलं जायचं पाल
अन्
तयार व्हायची वाकळ-
बापाच्या प्रेमाची,आईच्या मायेची!

सगळ्या चिंता पळून जायच्या
वाकळेच्या उबदारपणात,
मन ही रहायचं-कायम प्रसन्न
अन्
लक्ष्मी सदा स्थिर..हसतमुख!

आज लाज वाटतेय
वाकळ पांघरायची...
म्हणून,
मागवल्या जातात महागड्या रजई...
उबदार तर असतात पण
त्यात नसते बापाचे प्रेम,
नसते आईची माया ....
झोप ही असते अर्धवट
अन्
मन कायम उद्याच्या चिंतेत!
लक्ष्मी ही झालेय चंचल
अन्
माणूस धाव धाव धावतोय तिच्यामागे-
डोक्यावर ताणतणावाचे ओझे घेऊन!

आई बापाला विसरुन
वाकळेला नाके मुरडणा-यांनो,
रजईचा हव्यास सोडून
जरा वाकळ पांघरुन बघा....
बापाच्या प्रेमाचा अन् आईच्या मायेचा
ऊबदारपणा जरा अनुभवून बघा...
चिंता जाईल चितेवरी,
मन प्रसन्न हरघडी
अन्
लक्ष्मी पाणी भरेल घरी!!

*अनिल सा.राऊत*
9890884228