तू फक्त प्रेम कर

Started by विक्रांत, November 19, 2014, 07:30:00 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

वेडी आशा बाळगत
स्वप्न सोनेरी पाहत
तू फक्त प्रेम कर
प्रेमासाठी प्रेम कर

जन्मभर भटकू नकोस
वारा खुळा होवू नकोस
जीव जडव असा कुणावर 
सारे काही लाव पणावर

फक्त तिचा विचार कर
तिच्याशीच मैत्री कर
उगा लांबवर राहू नको
मनात मांडे खाऊ नको 
शब्दामधून शब्दावाचून
तिला येवू देत प्रेम कळून

प्रेम नको फक्त चेहऱ्यावर 
आत्म्यावरही प्रेम कर
आत्मा वगैरे ना कळले तर
प्रेम कर तिच्या मनावर
मन म्हणजे गुणावगुण
स्वीकार सारा मनापासून
   
अन कदाचित कळल्यावाचून
प्रेम बीज जर गेले मरून
दुख जपून मनात ठेवून
जा शोध जा नवी जमीन
पुन्हा पेर पाणी घाल
धीर धर जावू दे काळ
अलगद प्रेम येता रुजून
जीवापाड ठेव जपून

तिथे घाई चालत नाही
अरे तो बाजार नाही
सुरामध्ये भिजल्यावाचून 
गाणे कसे येईल कळून
जेव्हा तुला प्रेम मिळेल
जन्म खराखुरा कळेल
   

विक्रांत प्रभाकर