बट्ट्याबोळ

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, November 22, 2014, 02:28:59 PM

Previous topic - Next topic
बट्ट्याबोळ
(१४ मे २००० च्या 'महाराष्ट्र टाइम्स' मध्यें प्रकाशित)

परिक्षेतील मार्क्स पाहून
आई म्हणते "आता अभ्यास वाढव"
दफ़्तराचं ओझं वाहून
मी मात्र झालोय गाढव

शिशुवर्गापासूनच अभ्यासाच्या
पुस्तकांची असते रास
कुणालाच कसं कळत नाही
बालपणाचाच होतोय -हास

आईच्या डोक्यात नेहमी
माझ्या परिक्षेचे टेन्शन असते
बाबांना तर कामापुढे
बोलायलाही सवड नसते

गृहपाठ असतो भरमसाठ
आमची लागते पुरती वाट
संपवून उठता आई म्हणते
"कर आता पाढे पाठ"

नांव काढता खेळाचे
आईच्या रागाचा पारा चढतो
अभ्यासाला शिव्या देत
ढसाढसा मी सदा रडतो

पूर्वी कधी नव्हता म्हणे
शिक्षणाचा एवढा घोळ
हल्ली मात्र करून टाकलाय
कुणीतरी बट्ट्याबोळ