रात्र सुंदर, चंद्र सुंदर

Started by gaurig, December 15, 2009, 09:05:30 AM

Previous topic - Next topic

gaurig


रात्र सुंदर, चंद्र सुंदर

रात्र सुंदर, चंद्र सुंदर
रात्र काळी होत शाई, मन्मनाच्या कागदांवर

हे निघाले तारकांचे संथ तांडे डोंगराशी
रात्र थकल्या काफिल्यापरी उतरणीवर चहूदिशांशी
हे निघाले दव धुळीचे लोट अन् आले धरेवर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

शांतता ही काय वर्णू, तव मिठीसम आर्त सुंदर
चांदण्याने बहकलेल्या रात्रीचे या हर गात्र सुंदर
या तुझ्या अनिवार सईचे जीवघेणे सत्र सुंदर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

रात्र ओला शब्द मागे, या जिण्याचा अर्थ मागे
निरवतीच्या अक्षरांवर एक हळवी रेघ उमटे
रात्र वेडी, चंद्र वेडा, वेड माझे येई भरावर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर