तिचे मनोविश्व

Started by santoshi.world, June 04, 2010, 01:10:28 PM

Previous topic - Next topic

santoshi.world

तिचे मनोविश्व

आजकाल ती जरा विचित्रच वागत होती. सर्वांपासून अलिप्त रहायची. कोणाशी जास्त काही बोलायची हि नाही. ती सोडून तिच्या आजूबाजूच्या सगळ्यांना म्हणजेच तिचे ममी, पपा, तिचे मित्र-मैत्रिणीं यांना तिच्या वागणूकीतला हा फरक जाणवत होता, पण तिला नक्की काय झालंय हे कोणालाच काही कळत नव्हतं.

पण ती... तिच्या मते तिचे आता सुरवंटातून फुलपाखरात रुपांतर झाले होते. कारण हि तसेच होते. कालच तिचे त्याच्याबरोबर लग्न झाले होते आणि रात्री तिला भरपूर सुख देवून सकाळी तो नेहमीप्रमाणे कुठेतरी गायब झाला होता. पण तिला ह्यावेळी त्याच्या निघून जाण्याचे काहीच वाटत नव्हते. कारण रात्री परत भेटण्याचे वचन देवूनच तो निघून गेला होता आणि तिला हवे त्यावेळी तर तो तिच्या जवळच असायचा. डोळे बंद केल्यावर तिला त्याचं अस्तित्व जाणवत रहायचं.

आज रात्री हि तो ठरल्याप्रमाणे आला होता आणि त्याने तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले.
तिने लाडात येवून विचारले, "आज इतका उशिर का केलास यायला?"
उशिर कुठे गं! रोजच्या प्रमाणेच तर आलोय. उलट केव्हापासून तुझ्याच येण्याची वाट बघत होतो मी. तिने प्रेमाने त्याला आलिंगन दिले. त्याच्या केसातून हात फिरवत तिने विचारले, "आपण अजून किती दिवस असे चोरून भेटायचं?"
मग आता आणखी काय करुया तूच सांग. काल लग्नाचा हट्ट केलास म्हणून तुझी ती हि इच्छा पूर्ण केली. आता अजून काय करू मी शोना?
"तूला कळत कसे नाही रे! मला आता भासाच्या जगात राहायचा कंटाळा आलाय रे. मला साऱ्या जगाला ओरडून सांगायचंय आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आता तर आपलं लग्न हि झालंय ना मग आतातरी सर्वांसमोर येऊन मला स्विकार ना रे, असं रोज फक्त रात्रीच किती दिवस भेटायचं आपण? मला तू कायमचा हवा आहेस माझ्याजवळ" त्याच्या डोळ्यात बघत ती बोलत होती.
होय रे शोना, पण मी तरी काय करू ऑफिसमध्ये इतकं काम असतं, सध्या खूप बिझी आहे गं. पण कधी तरी तुझ्या आई-बाबांना येवून नक्की भेटेन हं. आता खूप थकलोय गं मी! मला तुझ्या कुशीत घे ना, असे म्हणून तो तिच्या कुशीत शिरला हि.

सकाळ झाली होती. तिने डोळे उघडले आणि आजूबाजूला पहिले. तो अजून साखरझोपेतच होता. त्याला उठवत त्याच्या केसातून हात फिरवत तिने विचारले, "मी जावू का रे? मला ऑफिसला जायला उशिर होतोय! तू हि उठ ना आता तुला हि निघायचं असेल ना.
थांब नं शोना. मला सोडून जावू नकोस ना प्लीज.
असं रे काय करतोस, उठ ना रे मला उशिर होतो मग ऑफिसला पोहचायला, जावू देत ना प्लीजजजजजज...
मिठीतून तिला सोडवतच त्याने विचारले, "रात्री लवकर येशील ना?"
"हो रे माझ्या राज्या" असे म्हणून त्याच्या कपाळावर एक चुंबन देवून ती निघून गेली.

जवळ जवळ एक वर्ष आधिच दोघांची हि एका सोशल साईट वर ओळख झाली होती. तिथेच तिने त्याचा फोटो हि पहिला होता. प्रत्यकक्षात एकमेकांना न बघता, न भेटताही फक्त चाट वर आणि फोन वर बोलता बोलता एक दिवस त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.

तो रोज रात्री तिला फोन करत असे. ती हि त्याच्याबरोबर बराच वेळ मध्यरात्र उलटेपर्यंत बोलत बसायची. तिच्या ममी पपांना ह्याबद्दल काहीच कल्पना नसायची. असणार तरी कशी म्हणा! एकुलती एक अपत्य असल्याकारणाने तिच्या पपांनी तिला स्वतंत्र बेडरूम दिली होती आणि ती हि कोणाला काही कळू नये याची पुरेपूर काळजी घेत होती. खरे तर तिला तिच्या ममी पपांना त्याच्याबद्दल सगळे काही सांगून टाकायचे होते, पण त्यानेच तिला "अजून इतक्यात कोणाला काही सांगू नकोस" असे बजावून ठेवले होते. आपण आधी प्रत्यकक्षात भेटू या आणि मगच योग्य वेळ आली की सगळ्यांना सांगूया असे त्याचे मत होते. म्हणून तिने हि मग ते गुपित स्वत:च्या मनाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवले होते.

तिच्यासाठी हे सारे नविन होते. तिच्या मते तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला अखेर सापडला होता. आता त्याला प्रत्यकक्षात भेटण्याची ओढ तिला लागली होती. तिने त्याला त्याबद्दल बरेचदा विचारले हि होते. पण तो खूपच बिझी असल्याचे कारण तिला सतत देत राहायचा.

माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं तिला सारखं वाटत राहायचं. SMS आणि फोनद्वारे ती त्याच्यावरचे आपले प्रेम सतत व्यक्त हि करत राहायची आणि तो... त्याच्या मनात तर काही भलतेच शिजत होते. खरे तर त्याच्यासाठी ती फक्त एक टाईमपास होती, just a TP... म्हणूनच बहुतेक तो तिला भेटण्याचे टाळत होता. हो नाही तर उगीच उद्या गळ्यात पडायची लग्न करच म्हणून. पण ह्या गोष्टीचे तिला भान नव्हते. ती त्याच्या प्रेमात पुर्णपणे आंधळी झाली होती. स्वप्नांत त्याच्याबरोबर रमू लागली होती. त्याच्याबरोबर चोरून भेटी गाठी, प्रेमळ क्षण सारे काही ती प्रत्यकक्षात अनुभवता येत नसल्यामुळे स्वप्नांत अनुभवत होती. 

असेच दिवस जात होते ती पुर्णपणे त्याच्यात गुंतत चालली होती. पण तो मात्र आता बदलला होता. त्याला आता तिचा कंटाळा येवू लागला होता. बहुतेक आता तो नविन टाईमपासच्या शोधात होता. त्याने स्वत:हून तिला फोन करणं तर बंद केलंच होतं, पण तिचा फोन हि आता तो टाळू लागला होता. "मी सध्या कामात आहे तुला नंतर फोन करतो शोना" अशी कारणं देवून तो फोन ठेवत असे. ती बिचारी दिवस-रात्र त्याच्याच फोनची वाट बघत उदास व्हायची. रात्री स्वप्नांत तो भेटल्यावर त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करायची. तुझं वागणं मला आजकाल अजिबात आवडत नाही. काय झालंय तुला सांग ना? असा का वागतोस हल्ली माझ्याशी? इतका काय बिझी आहेस की माझ्याशी बोलायला तुझ्याजवळ एक मिनिट हि नाही. मग नेहमीप्रमाणे स्वप्नांत तो तिची समजूत काढायचा. माझ्या शोना असं काय करतेस. अगं खरंच आजकाल कामात खूप बिझी झालोय गं मी. तुला फोन करायला खरं तर अजिबातच वेळ मिळत नाही, तुझी शप्पथ! असे म्हणून तिला आपल्या मिठीत ओढून घ्यायचा. हल्ली तिचं त्याच्याशी बरचसं बोलणं फक्त स्वप्नातच व्हायचं. त्यामुळे बरेच दिवस दोघांचा एकमेकांशी काही contact नसला तरी तिला तो तिच्यापासून दूर जाणवतच नसे. डोळे बंद केले की तो तिच्या आजूबाजूलाच कुठेतरी असल्याचा भास तिला सारखा होत असे.

कधी तरी त्याच्याशी प्रत्यकक्षात बोलण्याची उर्मी तिच्या मनात दाटून येत असे आणि अखेर न राहवून तीच त्याला फोन करत असे. पण त्याचे उत्तर ठरलेले असे, "कामात खूप बिझी आहे तुला नंतर कॉल करतो". ती हि मग स्वत:वरच आणि त्याच्यावरही नाराज होत असे त्याला फोन केल्याबद्दल आणि त्याच्याकडून अपेक्षित उत्तर आल्याबद्दल. पण रात्री पुन्हा तेच घडत असे, स्वप्नांत येवून आपल्या गोड बोलण्याने तो तिचा सारा राग दूर करत असे आणि प्रेमाने तिला जवळ घेत असे.

पण तिने आता ठरवलेच होते, जोपर्यंत तो स्वत: फोन करत नाही तो पर्यंत त्याला फोन करायचा नाही आणि प्रत्यकक्षात भेटण्याबद्दल हि कधीच काहीच बोलायचं नाही.

दिवसांमागून दिवस जात होते. जवळ जवळ सहा महिने झाले होते. त्याचा फोन किंवा साधा sms  हि आला नव्हता आणि तिने हि कधी केला नव्हता. पण तिला ह्या गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. रात्री स्वप्नांत येवून तो तिला दिवसभरातले सारे प्रेम देवून जायचा. तिच्याशी गप्पा मारायचा. तो आपल्याला कायमचा सोडून गेलाय हे तिच्या बुद्धीने मान्य केले होते पण तिचे मन अजून हि मानायला तयार नव्हते. ते दिवसेंदिवस त्याच्यात अधिकच गुंतत चालले होते. त्याच्या विचारातून बाहेर पडायला ते तयारच नव्हते. तिने डोळे बंद केले की तिला तो आसपास जाणवत रहायचा. तिने त्याला अजूनपर्यंत प्रत्यकक्षात कधी पहिले नव्हते पण त्याचा फोटो पहिला होता. फोटोतला तो आणि फोनवरचा त्याचा आवाज ऐकून स्वप्नांत त्याच्याबद्दल एक प्रतिमा तिच्या मनात तयार झाली होती. ती आता त्याच्या त्या प्रतिमेवरच प्रेम करू लागली होती. तिच्या इच्छा ती स्वप्नांत त्याच्याजवळ व्यक्त करायची आणि तो हि त्या पूर्ण करायचा.  स्वप्नातल्या त्याच्यामुळे ती आता प्रत्यकक्षातल्या त्याला जणू काही विसरूनच गेली होती आणि भासाच्या एका नवीनच जगात रममाण झाली होती.

आज जवळ जवळ दोन वर्षे पूर्ण झाली होती त्याला तिच्या आयुष्यातून निघून जावून, पण ती ... ती अजून हि तिच्याच स्वप्नांतल्या विश्वात रमली होती. त्याच्याबरोबर तिचा संसार हि सुरु झाला होता आणि आजच तिने त्याला एक गोड बातमी हि दिली होती. ती आई होणार असल्याची. तो खूप खुष झाला होता. आनंदाने त्याने तिला मिठीच मारली होती.
ये सांग ना आपलं बाळ कोणासारखं दिसेल गं?
तुझ्यासारखं... ती लाजतच म्हणाली.
नाही हं... मला तुझ्यासारखं हवंय.

आजकाल तिची तो खूप काळजी घेत होता. तिला काय हवे काय नको ते सारे पहात होता. पाहता पाहता नऊ महिने निघून गेले आणि अखेर तो दिवस उजाडला ज्याची ते दोघे आतुरतेने वाट पाहत होते. तिला असह्य प्रसुतीवेदना सुरु झाल्या. तो तिच्या जवळच बसून होता. तिने दोन जुळ्यांना जन्म दिला. एक मुलगा, एक मुलगी! त्यांचा सांभाळ करता करता दोघांच्या नाकी नऊ येत असे. पण दोघंही एकमेकांना सांभाळून घेत होती. त्याच्यासोबत ती खूप खुश होती.

दिवसेंदिवस तिचा हा मानसिक आजार वाढतच चालला होता, पण तिच्या ममी पपांना अजून तिच्या आजाराबद्दल काहीच कल्पना आली नव्हती. की बहुधा आपल्या मुलीला स्किझोफ्रेनिया असा काही एखादा आजार होवू शकतो असा विचार हि कधी त्यांच्या मनाला शिवला नव्हता. तिचे अबोल आणि एकटीच राहणे त्यांना खटकतही होते, पण त्याबद्दलचे कारण काही केल्या त्यांना कळत नव्हते. तिच्या मनाचा थांगपत्ता तिने कोणालाच लागू दिला नव्हता.

त्यादिवशी रात्री जेवताना पपांनी तिच्याजवळ विषय काढलाच. राणी आजकाल अशी अबोल का झाली आहेस तू? कसली चिंता आहे का तुला? कुणा मुलाच्या प्रेमात बिमात पडलीस नाहीस ना बेटा?
"काय हो पपा"! असे म्हणून ती लाजलीच.
बघ कुणी असेल तर सांग. तुमचं लग्न लावून देवू आम्ही, त्याबद्दल काळजी नको करूस बेटा!
पपा कुणी असेल तर मी तुम्हांला आणि ममाला सर्वात आधी येवून सांगेनच ना!
अच्छा कुणी नाही म्हणजे तर?
हो नाही! असे म्हणत तिने जीभ चावली.
अग मग तुला तो राहुल कसा वाटतो?
कोण राहुल पपा?
अग विसरलीस माझा मित्र दिनकर त्याचा मुलगा. लहानपणी तुम्ही दोघं एकत्रच खेळायचे नाही का.
त्याला काय झालं पपा?
काही झालं नाही पण तुला तो कसा वाटतो लग्नाच्या दृष्टीने? आजच दिन्याचा फोन आला होता. त्याने राहुलसाठी तुला मागणी घातली आहे.
काय हो पपा, मला इतक्यात लग्न नाही करायचंय.
पण का?
तुम्हां दोघांना सोडून मी कधीच कुठे जाणार नाही.
अग वेडे एक ना एक दिवस तर तुला जावेच लागेल ना तुझ्या सासरी.
"काहीही असो! मला इतक्यात लग्न नाही करायचंय" असे म्हणून ती जेवण अर्धवटच सोडून आपल्या रुममध्ये निघून गेली.

रुममध्ये आल्यावर तिने डोळे बंद केले. त्याने मागूनच तिला मिठीत घेतले.
"सोड मला" तिने लटक्या रागातच म्हणटले.
अरे काय झालं? आज माझी शोना माझ्यावर खूपच रागावलेली दिसतेय.
हो!
का बरे?
तू ममी पपांना कधी भेटणार आहेस?
भेटतो ना कधीतरी, काय एवढी घाई आहे शोना? असे म्हणत तो तिच्या केसातून हात फिरवू लागला.
तुला नसेल पण मला आहे. पपांनी माझ्यासाठी एक स्थळ आणलंय.
अरे वाह! कोण? कुठला? काय करतो मुलगा?
आहे कुणी तरी राहुल म्हणून पपांच्या मित्राचा मुलगा. लहानपणी म्हणे आम्ही एकत्रच खेळायचो.
अग मग बघ ना! चांगलं स्थळ असेल तर लग्न करायला काय हरकत आहे. तू खरंच कर लग्न त्याच्याशी.
हे तू म्हणतोयस? तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला.  अरे मी त्याला पाहिलं हि नाही आहे कित्येक वर्षात आणि मला आता आठवत हि नाही तो कोण आणि कसा दिसतो ते.
मला तरी अजून कुठे पाहिलंस आहेस तू शोना! तिची हनुवटी वर करत त्याने विचारले.
तुझी गोष्ट वेगळी आहे रे ... आणि तू विसरलास का? आपलं लग्न कधीच झालंय ते आणि आपल्या दोन पिल्लाचं काय? माझ्याशिवाय राहतील का रे ते?
जग नाही मानणार आपल्या लग्नाला शोना आणि बच्चू माझ्याजवळ राहतील गं. तू त्यांची आणि माझी अजिबात काळजी करू नकोस.
जग मानू देत अथवा नको पण माझ्यासाठी तूच माझा नवरा आहेस. त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली.
हो रे शोना, पण मी हा असा ... फक्त तुझ्या स्वप्नातल्या जगात राहणारा. साऱ्या जगासमोर येवून तुला नाही स्विकारू शकत गं.
पण का?
ते मला विचारू नकोस ना प्लीज...
मग जा इथून कायमचा निघून.
खरंच जावू का?
हो!
बरं जातो मग मी, तू तुझी काळजी घे आणि पपा म्हणतील त्या मुलाशी लग्न कर आणि सुखी हो.
तो उठून जाणार इतक्यात तिने त्याचा हात धरला आणि त्याला विनवू लागली, "नको ना जावूस प्लीज. तुझ्या शिवाय मी नाही जगू शकत रे!"
अग वेडे मी तुझ्या जवळच आहे बघ. तू जेव्हा मला बोलावशील मी तुझ्यासमोर लगेच हजर होईन.
पण मला तू कायमचा हवा आहेस रे, फक्त माझा म्हणून आणि माझ्या सोबत.
मला हि तू हवी आहेस शोना!
मग मी काय करू तूच सांग ना रे?
एक करू शकतेस ... आयुष्यभरासाठी कायमचे डोळे बंद करून, तुला तुझे जग सोडून, माझ्यासोबत माझ्या स्वप्नांच्या दुनियेत यावे लागेल, बोल आहेस का तयार?
हो आहे तयार. माझ्यासाठी तर तूच माझे जग आहेस! तू माझी परीक्षा घेतो आहेस का रे?
नाही गं वेडे, मी फक्त तुझी मस्करी करत होतो.
पण मी सध्या मस्करीच्या मुड मध्ये अजिबात नाही.
अच्छा! मग सांग कधी येते आहेस माझ्याजवळ कायमची तुझ्या ममी पपांना सोडून?
लवकरच! असे म्हणून तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि ती जोर जोरात हुंदके देवून रडू लागली.

सकाळी ती अजून कशी उठली नाही म्हणून तिची मम्मी तिच्या रुममध्ये येवून तिला उठवू लागली. पण ती उशीला तो समजून स्वत:च्या कुशीत घेवून कायमची निघून गेली होती, तिच्या स्वप्नांतल्या जगात, त्याला भेटायला. तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे घाबरून जावून तिच्या ममी ने तिच्या पपांना बोलावून आणले. अहो, बघा ना! हि उठत का नाही आहे? तिच्या पपांची नजर जवळच पडलेल्या बेगॉन स्प्रेच्या रिकाम्या बाटलीवर गेली. इतक्यात तिच्या ममाला तिच्या जवळच एक चिठ्ठी सापडली.

प्रिय ममी पपा,

मी राहुल बरोबर लग्न नाही करू शकत. कारण मी आता माझ्या राज्याकडे चालली आहे. खरे तर आमचं लग्न केव्हाच झालंय आणि आम्हांला आता आमचे दोन बच्चू हि आहेत. इतके दिवस हि गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली त्याबद्दल मी तुमची माफी मागते. काही कारणांमुळे मी त्यांना तुमच्या समोर नाही आणू शकली, पण कधी ना कधी तुमची आणि त्यांची ओळख नक्की करून देईन. मला त्यांची आणि त्यांना माझी खूपच गरज आहे म्हणून मी त्यांच्या जवळ कायमची चालली आहे. माझी काळजी करू नका. तुम्ही तुमची काळजी घ्या.

तुमची मुलगी
राणी.

समाप्त.

- संतोषी साळस्कर.

gaurig


pomadon

फारच सुरेख .........

MK ADMIN

#3
mast ch..


aani aaplya google group var sudhha send kela ahe... 10,000 members now.

patilhr07

mast lihilay..... :)
really heart touching...... :(

jayu




manoj vaichale

खूपच सुंदर लिहिला आहे

charudutta_090

very touching indeed.Mal "TO"ya jagi swathach aslyagat vatla....!!karan mi hi swapnat khup ramamaan hoto.Yathasthit jagaat,rasik lokanna nehemich ruksha lokach miltaat.(ha majha anubhav ahe)Mhanunach swapnat tari pranay rangaat rangta yeta ani yatunach kaavya sfurta....keep it upp.