आई मला पावसात जाऊ दे
आई मी पावसात जाऊ का?
नको नको नको-------- !!!
ए आई मला पावसात जाऊ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करती
विजा लकाकुन मला खुणवती
त्याच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचू दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करू दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप-खोकला -शिंका-सर्दी वाट्टेल ते होऊ दे
-----------------
गीत-वंदना विटणकर, संगीत-मीना खडीकर
गायक-योगेश खडीकर
(चोकलेटचा बंगला---बालगीते)