वैराग्याचा मेळा (गमन)

Started by केदार मेहेंदळे, January 30, 2012, 10:46:38 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

माझ्या 'गमन' ह्या संग्रहात मी मृत्यू, मुक्ती, पुनरजन्म, इ बद्दलच्या आपल्या कल्पना जरा वरखाली करायचा प्रयत्न केला आहे.   मृत्यू इतक गूढ काही नाही. अंत्य यात्रेत सुद्धा  मनाची  एक वेगळीच अवस्था होते. ह्या विषयावर हि कविता आहे.

जमला जन समुदाय अपार
मूक, उदास, गंभीर
कोणी उधळती अबीर बुक्का
कोणां  मुखी राम

राग, लोभ, नाती, गोती
काम, क्रोध न उरला काही
सर्व संग परित्याग करुनी
निजला जणूकि संन्यासी

आयुष्य भरी जो दिसला
तो देह समोर निजला
गेला सोडून जो देहाला
तो न कधी बघितला

अज्ञाताच्या या प्रवासाला
आत्मा नंगाच गेला
तिरडी वरी केवळ पसरला
देह रुपी अंगरखा

जमविला गोतावळा जरी
सारे प्रवासी घडीभरचे
अज्ञाताच्या या वाटेवर
अखेर एकटेच निघायचे

असतील अनेक जरी
सखे, मित्र, सोबती
संपणार साथ तयांची
स्मशान प्रवेश द्वारी

प्रवासी आपण घडीभरचे
पाव्हणेच या जगी
काढले तिकीट परतीचे
जन्मा आलो ज्या क्षणी

ना  रद्द व्हायचे तिकीट
ना गाडी कधी चुकायची
परतीच्या प्रवासाची ती
वेळ कधी न टळायची

उगवतील चंद्र तारे
चालेलच जग रहाटी
राहतील अंधुक आठवणी
भिंती वर फोटो जोवरी

मृत्यूचीच असे ओढ जीवा
तोच शाश्वत मित्र त्याचा
भेटता देती आलिंगन दोघे
जीव तत्काळ सोडी काया

चिंतेनी किती जाळला, देह
न जळला आयुष्य भरी
होता मुक्त चिंतेतून
तो, देह जळला  चिते वरी

राखले शरीर जन्म भरी हे
राख करण्याच स्मशानी
राख पसरता मनावरी ती
राखण्याची जिरली उर्मी

धडाडून पेटली चिता
वैराग्य धूर उडाला
कोण म्हणे हि अंत्य यात्रा
जमला वैराग्याचा मेळा



केदार....
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)

मुक्तातमा (गमन)

http://marathikavita.co.in/index.php/topic,7418.msg23616.html#msg23616