भाजीवाला भय्या

Started by विक्रांत, July 13, 2014, 05:58:22 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



अलिकडे भय्या
काठी घेवून येतो
सुजलेले पाय काहीसे
थोडा लंगडत चालतो
ते नेहमीचे त्याचे
ताडताड चालणे
दोन्ही हातात भरलेल्या
पिशव्या घेवून धावणे
ते काटक राकटपण
आता दिसत नाही
ढासळले शरीर पण
कष्ट चुकत नाही
प्रत्येक गिऱ्हाईकाशी
तो हसून बोलतो
स्त्री आणि पुरुषाला
तो साहेबच म्हणतो
त्याचा आता बराचसा धंदा
मुलगा सांभाळू लागला आहे 
वडीलासारखा सगळ्यांना
साहेब म्हणू लागला आहे
भाजी आणायला मी ही
कवचित आता जातो
पण गच्चीतून तो
मला रोज दिसत असतो
गाडीवर रचण्या पूर्वी
भाजी साफ करतांना
एक एक पान निवडून
जुडी नीट करतांना
रचणे त्याचे जणू
कुठली कलाकृती वाटते
हिरवीगार रसरशीत
कविता समोर दिसते 
तो फुटपाथ भैया गाडी
दिसले कि बरे वाटते
बाजूच्याच झाडासारखे 
सारे हृद्गत गमते
आणि तरी ही अजून
त्याचे नाव माहित नाही
मी कधी विचारले नाही
त्याने सांगितले नाही
माझ्या साठी भैया तो
त्यासाठी मी साहेब आहे
नावावाचून व्यवहारात
ओळख अन आब आहे

विक्रांत प्रभाकर