तिच्यावरील कविता

Started by विक्रांत, July 26, 2014, 06:37:11 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


म्हणालीस मला तू 
अलिकडे मजवरती
कविताच लिहित नाही
नक्की लिहीन म्हटल मी
खरं तर मला
तुला नाही म्हणण
जमतच नाही
पण कसं सांगू तुला 
तुझ्या सवे घालविल्या
क्षणांची धुंदी
उतरता नाही उतरत
मी जगत असतो   
पुन्हा तुझ्या सोबत
त्या क्षणांच्या सोबत
त्या शब्दांच्या सोबत
कविता जगत..
तुझ्या हसण्याच्या
प्रफुल्ल किनाऱ्यावर
असतो उगाच भरकटत
खळाळत्या लहरीसवे
दूरवर वाहून जात
वा कधी तुझ्या केसात
अडकलेला माझा जीव
उगाच असतो फडफडत
तुझ्या बटीची इर्षा करत..
ते सगळ शब्दात
खरच नाही उतरवता येत
कधी कधी वाटत
मी लिहिलेले शब्द
मलाच हसतात
पण तुला कबुल केले
लिहायला तर हवच
म्हणून कागद पेन घेतो
डोळ्यासमोर तुला आणतो
पण तुझ्या प्रेमाच्या
धुवांधार पावसात
शब्द शब्द वाहून जातो
या भिजल्या कागदात
आणि भिजल्या शब्दात   
बहुदा तुला कधीतरी
माझी कविता सापडेल
कदाचित मी सुध्दा !

विक्रांत प्रभाकर