ऐवज

Started by madhura, August 23, 2014, 11:56:03 AM

Previous topic - Next topic

madhura

कुणास आहे वेळ पहाया, वाचाया, लिहिलेले सारे?
दाद कशाची? कसल्या टाळ्या? तोंडपुजेपण, दिसते सारे!

एकमेक ओवाळत बसती....घालत बसती हार तेच ते.......
साटेलोटे चहूकडे जपतात केवढे निष्ठेने ते!

अलीकडे मी वाचत नाही प्रतिसादाची ओळ एकही......
लिहीत जातो फक्त उचंबळ, सोडत नाही मात्र एकही!

कधी कधी वाटते, कशाला वावरतो मी अंधांमध्ये?
झोपेचे सोंग घेतलेल्या या दुनियेच्या घोळक्यांमधे?

कुठे तरी एखादा दिसतो रसिक मला पण, प्रांजळ सच्चा.....
ज्याच्यासाठी नव्या नव्या मी पोस्टत असतो रचना माझ्या!

मुक्तछंद वा, चारोळी वा, गीत, गझल काहीही लिहितो!
काव्यच आहे ना हे बघतो, तेव्हा मग ते खुशाल लिहितो!!

कविता म्हणजे आत्म्याचा उत्स्फूर्त, आर्त उद्गार असावा!
वृत्त, आकृतीबंधाचा ना त्यास कशाचा पाश असावा!!

झरेल ते ते लिहीत जावे.....काळजास धुंडाळत जावे!
चिंतनातुनी जे जे मिळते, ते ते दुनियेला अर्पावे!!

अशामधेही अस्सल कवितांचीही येथे गजबज दिसते!
कविता नाही उरत कवीची, ती दुनियेचा ऐवज बनते!!
ती दुनियेचा ऐवज बनते!
ती दुनियेचा ऐवज बनते!
-------प्रा.सतीश देवपूरकर