स्वछ भारत अभियान

Started by केदार मेहेंदळे, October 31, 2014, 12:22:02 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

स्वप्ने सुशासनाची होती मनात माझ्या
देवून मोकळे ते, झाडू करात माझ्या

येताच लाट मोठी, वाहून त्यात जातो
धरसोड हीच वृत्ती, उरली उरात माझ्या

हाती जरी खराटा, अंगात स्वछ खादी   
भाषा अरे तुरेची, आहे मुखात माझ्या

कपडे भले विदेशी, घेतो कधी जराशी
(जपला इथे बघा मी, गांधी खिशात माझ्या)

होते कुटील लोभी, जे कालचे पुढारी 
झाले पवित्र सारे, येता पक्षात माझ्या

भंगार फेकले मी, सार्या रूढी प्रथांचे
राखून ठेवल्या पण, जाती घरात माझ्या

जाता न जात गेली, मार्गात धोंड ठरली
संख्या बनून उरली, या भारतात माझ्या

केदार...

वृत्त: आनंदकंद मात्रा : १२ + १२
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा