ती 'येते' म्हणाली होती…

Started by टिंग्याची आई..., February 27, 2015, 10:44:56 AM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...

ही आपली शेवटची भेट... असंच ती म्हणाली होती...
आणि खरंच त्या दिवशी... ती शेवटचीच भेटली होती...
त्या दिवसानंतर तिने... कधी मागे वळून पाहिलं न्हवतं...
परतीच्या वाटेवर... तिचं पाऊल कधीच वळलं न्हवतं...
भरल्या डोळ्यांनी... निरोपाची ती रात्र सरली होती...
त्यातला प्रत्येक क्षण... ती जाणून बुजून विसरली होती...
सगळं काही मागे सोडून... तिने नव्याने सुरुवात केली...
मनात उठणाऱ्या वादळावर... कशीबशी मात केली...
इतक्या वर्षांनी... तसं तिचं सुरळीत चाललं होतं...
भविष्याची स्वप्न बघण्यात... मनही चांगलं रमलं होतं...

तिला ठाऊक न्हवत...
आजही कुणीतरी... तिची मनापासून वाट बघत होतं...
शेवटची भेट आहे सांगूनही... पुढल्या भेटीची आस धरून होतं...
त्याचंही आयुष्य पुढे सरकलं... पण त्या क्षणांच्या अवतीभवती फिरत राहिलं...
त्या निरोपाच्या आठवणीने... आजवर डोळ्यांत पाणी दाटत राहिलं...

न चुकता आजही तो... त्याच  जागी तिची वाट पाहतो...
ती लवकर यावी म्हणून... बाप्पाला रोज दुर्वांची जूडी वाहतो...
इतकी वर्षं वाट पाहूनही... त्याचे डोळे अजून थकले नाहीत...
तिच्या वाटेवरचे आठवणींचे सडे... अजूनही सुकले नाहीत...

न राहवून कुणी विचारलंच...
तोडलेले बंध जोडण्याचा... कशाला व्यर्थ प्रयत्न करशील...?
परत न फिरणाऱ्या पावलांची... आणखी किती दिवस वाट पाहशील...?

त्यावर तो म्हणतो...
ठाऊक होतं मलाही... ती आमची शेवटचीच भेट होती...
पण जाता जाता नेमकी... ती 'येते' म्हणाली होती...
म्हणूनच मी आजही... तिच्या येण्याची वाट पाहतोय...
आठवणींचे सगळे थेंब... मनाच्या ओंजळीत साठवून ठेवतोय...

- टिंग्याची आई
http://tingyaachiaai.blogspot.ca/2014/11/blog-post_72.html

sudshree