फुलबाग जळल्यावर...

Started by विक्रांत, April 20, 2015, 09:35:10 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

फुलबाग जळल्यावर ठरवले
आता या वाटेला पुन्हा जायचे नाही
ज्वारी बाजरी मका कापूस
दुसरे पिक घ्यायचे नाही
फार काही नाही मिळाले तरी
उपासमार तर होणार नाही
पोट भरेल घर चालेल जरी
माडी घरावर चढणार नाही

पण जाता जाता रस्त्याने 
दिसतात कधी कुणाचे बगीचे
आकाश झगझगीत रंगाचे
श्वास होतात धुंद फुलांचे
डळमळतो निश्चय अन
पाय जणू होतात ओंडक्याचे
 
मग त्या दिवशी
बाजरीच्या बाजारात फिरता फिरता
मी विचारू लागतो
फुलांचे बियाणे ऋतुचा कल
अन बाजाराचं मागणे
तेव्हाच डोळ्यासमोर येतात
थकलेले आईबाप
काटकसरी बायको
शाळेत जाणारी पोरं
गोठ्यातील जनावरं 
अन मी पुन्हा घरी येतो तेव्हा
आणलेले असतात तेच
बाजरीचे करडईचे अन तिळाचे बियाणे
घट्ट मनाने

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/