एक झाड कवितेचं

Started by विक्रांत, June 09, 2015, 10:58:27 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

एक झाड कवितेचं
आत लावलय कुणी
आणि कळेना सदैव   
कोण घालतोय पाणी

प्रेमाची उब तयात 
विरहाची थोडी धग 
रक्तामध्ये दाटलेलं
दु:ख थोड थोडी रग

पेरल्यावाचून कुणी
घेवून आपली धून 
शब्द शब्द येती वर
उरातून उकलून 

कधी कधी उगाचच   
येते गर्द मोहरून
कधी कधी पान पान
जाते एकेक झडून

कधी खातो खस्ता कधी
सळसळे झळाळून
फळ फुले पक्षी होत 
जातो मस्त धुंदावून

कधीतरी आणि दोघे
येती दोन दिशातून
छाया माझी स्वप्न होते
शब्द जाती हरवून


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/