तू …. माझी पहिली ओळख
माझ्या अस्तित्वाची जाणीव झाल्यापासून
तुझ्याशी माझी नाळ जुळलेली
तुझ्या मऊशार गर्भात वाढत असतांना
किती ऊबदार अन सुरक्षित वाटत होतं
पहात होतो …. मी वाढतांना
तुझ्या चेहऱ्यावर ओसंडून वहाणारा आनंद
अन तुला जाणवणारी वेदनाही
किती काळजी घेत होतीस तू माझी
तुझ्या आवडी निवडीही बदलून टाकल्या
मला जे हवं ते सारे लाड पुरवत गेलीस
काळोख बघूनही कधी भीती वाटली नाही त्याची
कधी मी या जगात येणार
तुझ्या काळजाच्या तुकड्याला बघणार
असं झालं होतं तुला
माझीही उत्सुकता शिगेला पोहोचलेली
तुला अन या जगाला बघण्याची
पण खंर सांगू कां आई
तुझ्या गर्भाचं घरचं
खूप सुरक्षित होतं माझ्यासाठी
या जगाचा पसारा खूप मोठा आहे
पण या जगात आपलं म्हणावं असं
कुणीच दिसत नाही
सगळी स्वार्थानं झपाटलेली नाती
तुझ्याइतकं निरागस नातं कां नाही या जगात
कां नाही निरपेक्ष प्रेम कुणाच्या मनात
तुला विचारावसं वाटतं
पण तू ही निघून गेली आहेस वेगळ्या जगात
या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार कधीच
अन तुझी पोकळी कधीच भरून निघणारं नाही .
[/size]--संजय एम निकुंभ