Author Topic: पाऊस नुसता मनात झिरपत जायचा..!  (Read 742 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 175
पाऊस नुसता मनात झिरपत जायचा
●●●
आज पावसाच्या सरी आल्या, खरं तर यावर्षीचा पहिलाच पाऊस. अगदी वेळेवर आलेला. ते पावसाचे टप टप थेंब आणि सोबत अल्लड वारा, मधूनच चमकणारी वीज. सगळे परिचयाचे असले तरी प्रत्येक वर्षी पहिला पाऊस सुरू झाला की, वातावरणात एक वेगळाच उत्साह येतो. कुठे दूरवर पावसाचे थेंब मातीवर पडून तो मृदगंध वाऱ्यासोबत वाहून आला की तो सुगंध अंगात भिनत जातो. एक अल्लड मुलगी सासरी गेल्यावर जशी दोन-चार तासात एक जबाबदार स्त्री बनते, तसा पाऊस आला की तो तप्त उन्हाळा जाऊन काही तासातच ऋतू पालट होऊन जातो.  पाऊस मला पहिल्यापासूनच प्रिय..अगदी लहानपणापासून... लहानपणी पाऊस आल्यावर घर गळायला लागले की आई, घरातले भांडे पाणी गळणाऱ्या जागेत ठेवायची, कधी खूपच गळायला लागले की, कुठलीशी मोठी कपडे चार बाजूला बांधायची, सर्व पाणी त्यामुळे एका ठिकाणी पडायचे. त्यावेळी पावसाचा राग यायचा. पाऊस पडून गेला किंवा तीन चार दिवस मुक्काम करून गेला की गल्लीत चिखलाची किचकीच व्हायची ते पण आवडायचे नाही. मात्र असे असले तरी पाऊस मात्र आवडायचा. गल्लीतून वाहणारे पुराचे पाणी बघतांना, त्यात होड्या सोडतांना, त्यावर मातीचे धरण करताना, एकमेकांच्या अंगावर पावसाचे गढूळ पाणी उडवतांना, ओल्या मातीचे खोपे आणि घरे बनविताना जाम मज्जा यायची. त्यावेळी किती सहज घर बनायचे. कुठले लोन काढावे लागायचे नाही, हप्ता भरण्यासाठी नोकरी धंदा करावा लागायचा नाही. पाऊस आला की ते सर्व अगदी सहज करता यायचे.
पाऊस पडून गेला की हळूहळू सर्व शिवार हिरवीगार व्हायची. जणू ह्या धरणीमातेने हिरवा शालूच परिधान केलेला आहे असेच वाटायचे. वर गच्च भरून आलेले आभाळ, सभोवतीचा हिरवागार परिसर आणि अशा वेळी अंगावरून थंड हवा गेली की अंगात एक शिरशिरी उठायची. एक सुखद अनुभूती देऊन जायची.
कधी वाटायचे हा पाऊस नुसता पडत रहावा, सतत तीन चार-पाच दिवस, शाळेची अवघड गणितं आणि गुरुजींची ती छडी वाहून जावी पुरात, मग मज्जाच मज्जा, नुसते खेळायचे घरात, मंदिरातल्या मोकळ्या जागेत, वाहणाऱ्या पाण्यात, किंवा दूर डोंगरावरच्या खोंगळ्यातून वाहणारे पांढरेशुभ्र पाणी पाहत नुसते बसून राहावे तासन्नतास. पण नेहमीच तसे व्हायचे नाही. पाऊस एखाद्या पाहुण्यासारखा येऊन मनसोक्त बरसून जायचा पाठीमागे निरभ्र आकाश ठेवून अलगद पसार व्हायचा. मग मित्रमंडळी जमायची अन गोणपाटाचे घोंगटे अंगावर घेऊन सगळी स्वारी गावाशेजारच्या नदीतीरावर जमायची. नदी तिच्या सीमेबाहेर येऊन वाहत असायची. त्या गढूळ पाण्यात मग कित्येक गोष्टी वाहून आलेल्या दिसायच्या.खेकडे, माशा, यासोबतच पालापाचोळा, लाकडे, बाभळी, सगळे काही वाहून यायचे. कधी शेतीची औजारे वाहून जायची. नदीला आणि पावासाला त्याचे सुखदुःख नसायचे. एखाद्या स्थितप्रज्ञासारखे ती दोघेही आपली कामे चोख बजवायची. नदीत सर्व कचरा वाहून जातो म्हणूनच की काय लोकं नदीत अंघोळ करायला जात असावी असे मला कितीतरी दिवस वाटायचे. माणसातला कचरा कदाचित नदीलाही वाहून नेणे शक्य नसावे.
पाऊस पडून गेला की सगळे कसे ताजे टवटवीत व्हायचे, सगळी घरे, मंदिरे, डोंगरे धुवून निघायची. जणू त्यांनी अंघोळ केली असे वाटायचे. झाडांची पाने तजेलदार दिसायची. पक्षी आपले पंख झटकायला लागली की एवढ्या पावसात कुठे थांबत असतील बिचारे असे मनाला वाटून जायचे.
पावसाळा सुरू झाला की काही दिवसांनी शाळा उघडायची. सुट्ट्या लागल्यावर सुट्ट्या संपूच नये असे वाटायचे.मग शाळा सुरू झाली तरी उगीच दोन-चार दिवस शाळा बुडवायची. नव्या वह्यांना एक वेगळाच सुगंध यायचा. तो ओलसर वास पुन्हा शाळेची गोडी लावायचा.
सुट्टीच्या दिवशी शेळ्यांमागे, गुरांमागे डोंगरावर जायचे. तिकडच्या नाल्यात मनसोक्त पोहायचे.पाण्यात शिवाशिवी खेळायची, दुपार झाली की तिथल्याच एखाद्या काळ्याकुट्ट मोठ्या दगडावर बसून सर्वांनी सोबत आणलेली भाकरी सोडायची.बाजरीची भाकरी, लोणचं आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा खाऊन तृप्तीचा जो ढेकर यायचा तो आजपर्यंत काहीपण खाऊन कधीच आला नाही. भाकर खाल्ली की तिथल्या झऱ्यावर कुठल्याशा दगडाखाली, स्वच्छ थंडगार पाणी खाली वाकून तोंड लाऊन प्यायचे आणि मग खेळायला धूम ठोकायची.जनावरे चरत रहायची आणि मुले खेळत बागडत रहायची. कोणते जीवन चांगले होते या प्रश्नांचे उत्तर मात्र कधीच मिळत नाही.फरक फक्त एव्हढाच होता, तेव्हा जगण्यात सुख होते. आणि आता सुख मिळवण्यासाठी जगतो.
दूरवर पुन्हा आभाळ भरून यायचे. काळ्याकुट्ट ढगांनी अंधारून जायचे. विजांचा कडकडाट व्हायचा. शेतात काम करणारी बाया माणसे लगबगीने घराकडे धावायची.गावाकडे परतत असताना पाऊस मध्येच गाठायचा.सर्वांग ओलेचिंब होऊन जायचे. केसांतून, कपड्यातून, डोक्यातून, पाणी ओघळायला लागायचे. सगळीकडे पाणी वहायला लागायचे. तेव्हा मनात नुसता पाऊस झिरपत जायचा. मनातल्या भावना हिरव्यागार करत जायचा. स्वप्नांना आशेचे नवे पंख दाखवत जायचा.
 निरुत्साही मनाला नवपल्लवित करत जायचा. मनात नुसता पाऊस झिरपत जायचा..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com