Author Topic: ...राहिल्या फक्त आठवणी  (Read 747 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 175
...राहिल्या फक्त आठवणी
« on: October 19, 2018, 11:22:39 PM »
राहिल्या फक्त आठवणी
"गेले ते दिवस,राहिल्या फक्त आठवणी" ह्या ओळी कुठल्या मोटार सायकलच्या किंवा ट्रकच्या मागे वाचल्या की मनात उगीच कालवाकालव होते. जगलेल्या क्षणांचे नकळत आठवणीत रूपांतर होत जाते. ते दिवस जगतांना ते नेहमीच चांगले,आनंददायी असतात असे काही नाही; ते कधी आनंददायी असतात तर कधी त्रासदायकही. मात्र त्यांचे आठवणीत रूपांतर होताना ना जाणे कुठून त्यात कोमलपणा,हळुवारपणा येतो. एखादे मऊ पीस गालावरून फिरवावे आणि त्याच्या स्पर्शाने आपण पुलकित होऊन जावे तशीच काही अनुभूती आठवणी देतात.
जीवन म्हणजे जणू आठवणींचे गाठोडेच. अनुभवांचे पुंजके जमा करत आपण जगत असतो. त्यात विविध अनुभव येतात. कधी हर्षाचे तरंग उठतात तर कधी दुःखावेगाने जीव त्रासून जातो. नजर लागावी इतका आनंद तर जगणे मुश्किल व्हावे इतके दुःख, या सुखदुःखाच्या झोपाळ्यावर जणू मानवी आयुष्य झुलत असते.
"रम्य ते बालपण" म्हणत आपण बालपणातल्या आठवणीत गुंग होतो. बालपण किती अल्लड, किती खोडकर, त्याचबरोबर किती निष्पाप किती निर्विवार. पाण्यात होडी सोडण्याइतकी श्रीमंती बालपणानंतर कधी आपल्या जीवनात आलेली नसते. भांडणं, धिंगामस्ती, अभ्यासाचा कंटाळा, शाळा आणि शिक्षकांचा धाक आणि ओढही, नदीकिनारी खेळलेल्या सुरपारोंब्या, पाराशेजारची कबड्डी, आणि खोखो, चोरपोलिस खेळतांना आलेली आपसूक प्रौढतेची जाणीव... आणि भूक लागल्यावर आठवणारे घर आणि आई. सगळं कसं आठवणींच्या कुपीत गच्च भरून ठेवलेलं.
तो कॉलेजचा पहिला किंवा कुठलासा दिवस ...तिची न आपली झालेली पहिली नजरानजर...आणि मग ईश्क,प्रेम की काय म्हणतात ते,त्याची जाणीव होऊन पोटात उठलेला गोड हवाहवासा वाटणारा सुखद गोळा. आणि पुढे मग कित्येक दिवस आणि कित्येक रात्री तिच्या गोड आठवणीत गेलेल्या. तिचा एखादा शब्द ऐकायला मिळावा किंवा तिच्याशी दोन शब्द बोलायला मिळावे यासाठी केलेली धडपड. जगाचे सारे सुख जणू आपल्याच पायाशी लोटांगण घालतेय याची येणारी सुखद अनुभूती. कधी योग आलेला असतांना कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तिच्यासोबत पिलेला,अमृतालाही लाजवील असा तो कटिंग चहा. सगळं कसं स्वप्नवतच.
जशा तिच्या सोबतच्या आठवणी गोड तशाच ती सोडून गेल्याच्या आठवणी जीवघेण्या,मनावर आघात करणाऱ्या. ती का अशी एकाकी सोडून गेली असेल हा प्रश्न मनाला पुन्हा पुन्हा विचारत जगणे अन तेही तिच्याच आठवणीत, त्या आठवणी मात्र मनाला कुरतडणाऱ्या,मनाला पोखरून टाकणाऱ्या. विरह अग्नीत भस्मसात होतानाही, त्यात समिधा अर्पण करायच्या त्याही तिच्याच आठवणीच्या.
जसे हे एक विश्व असते तसेच एक विश्व असते मैत्रीचे घराबाहेर पडायला लागल्यापासून गल्लीतल्या लंगोटी मित्रांपासून ते शाळा, कॉलेज आणि ऑफिसातल्या मित्रापर्यंत मैत्रीचे विश्व विस्तारलेले. ऑफिसमधली मैत्री काहीशी औपचारिक, थोडीशी शिष्टपणा असलेली. तिला शाळा कॉलेजातल्या मैत्रीची सर नाही यायची. मग जुन्या मित्रांच्या आठवणी घालत बसतात पिंगा आपल्या मनाशी. मित्रांसोबत जगलेले बिनधास्त आयुष्य, केलेली मौजमस्ती, अडी-अडचणीत दिलेला एकमेकांना आधार, कधी केलेली टवाळखोरी, पैसे नसताना जुळवाजुळव करून केलेली पार्टी, ते सगळं जगताना समजायचं नाही की ते ही दिवस सुरेख होते तर, मात्र मोठं होण्याच्या, करिअरच्या नादात ते मैत्रीचं वर्तुळ मागे पडत जातं. मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्येच मित्रांची यादी अडकून जाते आणि मनात उरतात फक्त आठवणी.
घर सोडून बाहेरगावी शिकण्यासाठी जाताना आईने डोळ्याला लावलेला पदर आणि तिच्या आशावादी डोळ्यात भरगच्च भरलेले अश्रू, ताईला सासरी जाण्यासाठी निरोप देताना आलेला गहिवर, शाळा कॉलेजात निरोप समारंभात भाषण करताना जड झालेला आवाज, आपल्या प्रिय व्यक्तीने आपला आणि जगाचा घेतलेला आकस्मात निरोप हे आणि असं बरच काही, सगळं कधीच न विसरता येणारं.
चांगल्या असो वा वाईट आठवणी मात्र मागे राहतातच. कधी छळतात, कधी डोळ्यांच्या कडा पाणावतात. कधी आनंदाचे स्मितहास्य चेहऱ्यावर फुलवतात. कुणी आठवणींवर आपले आयुष्य काढतो, कुणाला आठवणीमुळे आयुष्य असह्य होते. काही लोकं क्षणभर किंवा फारच कमी वेळासाठी आपल्या आयुष्यात येतात. मात्र ह्रदयात एक घर करून जातात. त्याउलट काही लोकं खूप काळ संपर्कात राहूनही आठवण ठेवण्यासारखं काही मागे उरत नाही. आठवण हा भावनेचा खेळ आहे. मनावर उठलेल्या स्पंदनाचा खेळ आहे. गेलेल्या क्षणांची ती मागे उरलेली सावली असते. म्हणून जीवनात जगतांना मनसोक्त जगूया, प्रत्येक क्षण आनंदाने जगूया. प्रत्येक क्षणाचा उत्सव करूया. सुंदर आठवणी निर्माण करूया. कारण दिवस जातात निघून..मागे उरतात त्या फक्त आठवणी..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता