Author Topic: सोपी वाट जगण्याची  (Read 836 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,349
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सोपी वाट जगण्याची
« on: November 30, 2018, 05:06:02 AM »
सोपी वाट जगण्याची

दूरवर क्षितिजाला स्पर्श करणारा तांबूस गोल अगदी सावकाश, अलगदपणे मार्ग आक्रमीत होता आणि समांतर उडणारे समुद्र पक्षी एका अदृष्य गंतव्याकडे झेपावत असताना... शरीराला हळूवार स्पर्शातून जाणवणारा किनाऱ्यावरचा मंद वारा, एका वेगळ्याच विश्वात तन मनाला समाधिस्थ करीत होता आणि विसर पाडीत होता आजूबाजूच्या सर्व व्यवहारीक जिवंतपणाचा. समुद्राच्या मंद, खळखळाट करणाऱ्या शितल लाटा शिवाशिवीचा खेळ खेळत किनाऱ्याची भेट घेऊन परत जातांना मन सुद्धा नकळत त्यांच्या सोबत हेलकावे खायला लागतं, तेव्हा लाटांची अशी आवर्तनं का कुणास ठावूक मनाला जवळची, आपलीशी वाटू लागतात.

एरवी उर्जेचा, जगण्याचा आणि उत्साहाचा असीम स्त्रोत घेऊन उजाडणारा असाच अल्हाददायक, केशरगर्भ दिवाकर तप्त दुपारशी कधी आणि कशी जवळीक साधतो आणि नंतर सावकाश, अलवारपणे संध्याकाळशी हितगूज करू लागतो ते उमजतच नाही, हे सारं कळतं केवळ हातातील किंवा भिंतीवरील घड्याळाच्या पुढे पुढे सरकणाऱ्या काट्यांमुळे, ए.सी. ने थंड झालेल्या काचेच्या बंद गगनचुंबी इमारतीच्या वातावरणातील आतल्या जगाला बाहेरचं जग सहसा मोकळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे उघड्या डोळ्यांनी सहजपणे पहायला अनुभवायला आणि डोळ्यात साठवायला वेळ नसतो, नेमकं असं आयुष्य हल्ली संपुर्ण जगात बहुतेक लोक जगताहेत असं वाटतं.

आधुनिक प्रगत साधनांमुळे खरंच आपण विकसित की मेकॅनिकल झालोय? की रोज होणाऱ्या शोध आणि संशोधनांना युज टू झालोय? नाही लक्षात येत ना? बरोबर आहे कारण आधुनिक साधनांचा एवढा प्रचंड पगडा आपल्या रोजच्या जीवनावर पडला आहे की त्यामुळे आपली विचारशक्ती सुद्धा सीमित होऊ लागली आहे. जरा विचार करा अगदी सकाळी उठण्यासाठी सुद्धा आपण अलार्म सारख्या यंत्रावर किंवा एखाद्या मशीनवर अवलंबून रहातो... काही सन्माननिय अपवाद असतीलही, त्यानंतर संपूर्ण दिवसाभराची तशीच अवस्था होऊन जाते. नैमित्तिक प्रवास, कार्यालय सर्व ठिकाणी संगणका पासून नोटा, चिल्लर मोजणे ते चहा कॉफी, पोळ्या बनविण्या पर्यंतची अनेक यंत्रे काळाची गरज म्हणून आली? आणि आपण ती सर्रासपणे वापरतोय. अर्थात मला त्या यंत्राच्या निर्मिती मागच्या मेहनतीची, कल्पनाशक्तीची किंमत आणि त्याबद्दल कौतुक आणि आदर नक्कीच आहे.

कधी विचारतो का आपण आपल्या मनाला प्रश्न "की आपण आपलं जगणं सोप केलय की परावलंबी?" मला ते सहज परावलंबी झालेलं जाणवतं, कारण हल्ली साध्या साध्या गोष्टींसाठी आपण मशीन, यंत्रावर निर्भर राहू लागलो, साधं गणित करायचं म्हटलं तर आम्हाला कँलक्युलेटर हवा, त्यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागली. बारकाईने निरीक्षण केल्यास अशा अगणित छोट्या छोट्या गोष्टी समोर येतील आणि लक्षात येईल की अरे, ही कामं आपण या अगोदर स्वत:च तर करीत होतो... सोप्पी तर आहेत.

विषय जरा भरकटला वाटतं? तर मंडळी तसंं नाही, विषय तोच आहे म्हणजे आपण निसर्गाने बहाल केलेल्या उपजत गोष्टींपासून दूर होऊ लागलोय. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे एकदा का आम्ही इमारतीत शिरलो की आम्हाला दिवसभर सुर्यदर्शन होत नाही, मग सकाळचा रम्य  सुर्योदय कसा कळणार? मोकळी शुद्ध हवा नाही, समुद्राच्या खारट वाऱ्याची चव नाही, वृक्षवेलींचा स्पर्श नाही, स्पर्श होतो तो केवळ घरातल्या कोपऱ्यातील आणि तसबिरींवर असलेल्या प्लास्टिकच्या फुलांचा. तसंच कुणाशी मोकळा संवाद नाही, प्राण्यांशी खेळणं, दंगामस्ती करणं नाही. मान्य हे सारं खेड्यात आहे, पण हल्ली आधुनिकीकरणाच्या नावाने खेडी सुद्धा कात टाकू लागलीत.

आधुनिकीकरण, शहरीकरण वाईट नाही, त्याच्या आहारी जाऊन त्या सोई सुविधांचा अतीवापर वाईट आहे. गरजेनुसार त्या त्या सुविधा वापरून अलिप्त राहता यायला हवं. बऱ्याचदा ते जमत नाही म्हणून सुट्टी घेऊन पर्यटन केले जाते, ते सुद्धा स्पर्धेतून किंवा चढाओढीतुन होताना दिसते, काहीही असो त्या निमित्ताने माणूस निसर्गाच्या जवळ जातोय हेही नसे थोडके.

पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या या शरीराला आणि निसर्गाला एकरूप होउ द्या, ईतकी वर्षे तोच आपलं अनेक स्वरूपात भरण पोषण करतोय, त्याला नाकारून कसे चालेल? आपण त्याला नाकारून किंवा त्यावर कुरघोडी करू लागलो तर तो त्याचे रौद्र रूप दाखवतो जे मानवी क्षमते पलीकडे आहे याचं भान ठेवायला हवं. आजच एका कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की "लहानपणी गावी एक देऊळ बांधताना शेजारी वेगवेगळ्या प्रकारची पाच सहा झाडं लावली होती. खुप वर्षानी तिथे पाहिलं तर लक्षात आलं की ती झाडं मोठी झालीत, त्यांना फुलं फळ येतात, त्यावर अनेक पक्षी येतात, गुरं ढोरं, वाटसरू त्यांच्या सावलीला थांबतात, हा झाला त्यांच्यातला बदल, पण देऊळ तसचं आहे. माझ्या मते निसर्गच खरा देव आहे?" कीती स्पष्ट विचार आहेत नाही? तर मंडळी निसर्ग आपला आहे आणि आपण त्याचे, तर म्हणूयात...

"जोपासना करूया निसर्गाची,
होईल सोपी वाट जगण्याची".

©शिवाजी सांगळे, मो.+९१ ९५४५९७६५८९
« Last Edit: November 30, 2018, 05:09:50 AM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता