Author Topic: अंतास आज माझ्या टाळू नकोस आई..... (गझल काव्य)  (Read 664 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 372
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
पाहून रक्त माझे हारू नकोस आई
लाचार या जगाशी भांडू नकोस आई

ही आसवे मनाची बघणार कोण आता
झाकून ठेव यांना सांडू नकोस आई

हो धाडशी मनाने खंबीर हो उभी तू
पायात तू कुणाच्या वाकू नकोस आई

खाऊन वाळलेली भाकर जगून घे गं
स्वप्नात तूप पोळी लाटू नकोस आई

वाहून शेत माळी अर्थास अर्थ नाही
शेतीत घाम आता टाकू नकोस आई

मी भांडलो कितीही वैरीच राजनीती
ही झुंज वादळाशी पाहू नकोस आई

घेवून संप मागे टांगून घेतले मी
मागून फास माझ्या घालू नकोस आई

देतील बाद माझ्या सरकार कर्जमाफी
खोटेच हे दिलासे भाळू नकोस आई

जातो अखेर आता कर मोकळे शशी ला
अंतास आज माझ्या टाळू नकोस आई
---------------------------//**--
©
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
दि.२५ जून, २०१८
Its Just My Word's

शब्द माझे!