Author Topic: धोंडी  (Read 433 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
धोंडी
« on: April 03, 2018, 01:19:20 PM »
दुष्काळ पडल्यावर ग्रामीण महाराष्ट्रात मुलं कडुलिंबाच्या डहाळ्या अंगावर बांधून ‘धोंडी धोंडी पाणी दे' असे ओरडत घरोघरी जात आणि त्यांच्या अंगावर लोक पाणी टाकत. याला धोंडी म्हणतात.
        अशाप्रकारे धोंडी काढून निसर्गाला आवाहन केल्याने पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे. त्या संबंधात व पाणी फाऊंडेशनच्या कार्याला पूरक अशी माझी ही कविता सादर करीत आहे.

    धोंडी

धोंडी धोंडी पाणी दे
धो धो पाऊस पडू दे

आकाश कोसळलं
कोसळू दे
धरणी फाटली
फाटू दे
संकटांशी लढण्यासाठी
फक्त मला धैर्य दे
धोंडी धोंडी पाणी दे
धो धो पाऊस पडू दे

दुष्काळ पडला
पडू दे
पाणी आटलं
आटू दे
विहिरी तळी खोदण्यासाठी
फक्त हाती बळ दे
धोंडी धोंडी पाणी दे
धो धो पाऊस पडू दे

विहिरी तळी
भरू दे
पाणी पिण्या
मिळू दे
तहानल्या जीवासाठी
फक्त घोटभर पाणी दे
धोंडी धोंडी पाणी दे
धो धो पाऊस पडू दे

शेत भात
पिकू दे
बळीराजा
जगू दे
मरणा विरूद्ध लढण्यासाठी
फक्त दैवाची साथ दे
धोंडी धोंडी पाणी दे
धो धो पाऊस पडू दे

आता मरणाची
कास नाही
केवळ जगण्याची
आस दे
एकमेका हात धरून
फक्त लढण्या साथ दे
धोंडी धोंडी पाणी दे
धो धो पाऊस पडू दे

- अरुण सु.पाटील
 
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता