आपला काहीही दोष नसताना निर्माण होणार्या दुर्धर परिस्थितिने
खचून गेलेल्या मनात आयुष्याची अखेर व्हावी असे विचार येतात.
परंतु त्याच वेळी मनातला एक खंबीर आणि कणखर भाग
नशिबा बरोबर जिद्दीने झुंजायला सांगतो म्हणजेच हसत हसत
दु:खाला सामोरं जायला सांगतो. किंवा वेगळ्या भाषेत सांगायच
झाल तर भोग उपभोगायला सांगतो.
--------------------------------------------------------------------------------
भोग उपभोग
त्यजु न शकसी बंदिशाला
अजुन ना संपे सजा
शेष असती जे नशीबी
भोग उपभोगून जा
दुःख प्याला भर भरोनी
देई तुजला प्राक्तन
नीलकंठापरि हलाहल
करुन टाकी प्राशन
कैफ चढु दे त्या विषाचा
उन्माद अंगी माजु दे
अन् तुझा आवेश बघुनी
नियति ही थरकापु दे
भोग उपभोगीन मी
ही जिद्द मनि तू जागवी
फोल ठरू दे घाव त्याचे
प्राक्तना त्या लाजवी
जिद्द धरता मनि अशी ही
होई नियती हतबल
इष्ट ठरुनी फलस्वरूपे
देई आपत्ती बल
-----------------------------------------
...... उल्हास भिडे ...... ८-ऑगस्ट २००९