Author Topic: आता सहकुटुंब तुम्ही माझ्या घरी आलात तरी चालेल  (Read 623 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple

आता सहकुटुंब तुम्ही माझ्या घरी आलात तरी चालेल.
दारापुढे कार पार्क केल्याने माझे घर
पूर्वी इतके ओशाळणार नाही.
मी बदलून टाकले आहेत
घराला लावलेले पूर्वजांच्या जिव्हाळ्याचे टेकू
आणि तुमचा नम्रपणा गळून पडणार नाही उंबरठ्याशी
याची काळजी घेतली आहे.
थोडक्यात, घराचे चित्र मी बदलून टाकले आहे.
आतून बाहेरून.
तुम्ही याल तेव्हा परंपरेचे लाकूड मोडून बनवलेल्या
टीपॉयवरचा इंग्रजी पेपर तुमचं स्वागत करेल.
आई सवयीने नंतर पाणी तापवण्यासाठी
वर्तमानपत्राचा उपयोग करेल
म्हाताऱ्या आईला उतारवयात कोंडले असा
तिचा मुळीच आरोप नाही माझ्यावर आणि घरावरही
तीही दारावरच्या बेलने दचकून उठेल तुमच्या स्वागतासाठी
तुम्ही याल म्हणून किंवा येऊन गेल्यानंतर
आता आई घर सारवणार नाही शेणामातीने
तर ती लादी पुसत राहील घरपण टिकवण्यासाठी
घर आता छान वाटते.
हवेशीर खिडक्या बुजवूनही उजेड पुरेसा आहे.
वडिलांचा फोटो पोटमाळ्यावर सुरक्षित आहे.
आईच्या कण्हण्याचा आवाज तेवढा
येत नाही घुसमटलेल्या शांततेतून.
आता सहकुटुंब तुम्ही माझ्या घरी आलात तरी चालेल.
तुम्हाला घर आता अधिक सोईचं वाटेल.

......संदेश ढगे