Author Topic: रस्त्यावरील म्हातारी  (Read 661 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
रस्त्यावरील म्हातारी
« on: October 06, 2014, 10:42:12 PM »


पावलो पावली
थबकत थांबत
चाले म्हातारी
पाय ओढत

धापा टाकत
कपाळ पुसत
नकळे कुठले
ओझे वाहत
 
शुभ्र केस
त्वचा रापली
चेहऱ्यावरती
विणली जाळी

जुनेर साडी
जुनाट पोलके
जीर्ण पायताण
अंगठा तुटके

होती सभोवत
गर्दी धावत
कुणी न पाहत
कुणी न थांबत

नाव जणू ती
पाण्यामधली 
शीड सुकाणू
नांगर तुटली 

हळू हळू ती
वळणावरती
सांज उन्हागत
गेली निघुनी

मनी माझ्या
एक उदासीन
कातर संध्या
आली दाटून

मला कदाचित
असेल दिसले
शेवटचे दिस
माझे उरले

अथवा अर्थहीन
जगण्यामधले
सत्य उजाड
पथी सांडले

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: October 10, 2014, 09:27:55 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता