Author Topic: खाटकाचं पोर… पुन्हा…  (Read 410 times)

खाटकाचं पोर… पुन्हा…
« on: March 12, 2015, 11:11:53 AM »
हि कविता वाचण्याआधी तुम्ही 'खाटकाचं पोर…(http://tingyaachiaai.blogspot.ca/2012/06/blog-post_2927.html)' हि कविता वाचावी असं मला वाटतं, कारण या कवितेवरून मला 'खाटकाचं पोर… पुन्हा…' हि कविता लिहावीशी वाटली… 

बाचं घर सोडलं… आज दहा वर्षं झाली…
परतीची वाट… मी आजवर नाहीच पाहिली…
एक वेगळं अन चांगलं… जग शोधायला निघालो होतो…
पण इतक्या वर्षांत… मी स्वतःच कुठेतरी हरवलो होतो…
बकरी मारावी लागली… म्हणून खाटकाचं घर सोडलं…
अन इथे… माणसाचा जीव घेणाऱ्या माणसांना पाहिलं…
'जनावराचा जीव घेणं बरं…' बाचं वाक्य आजही आठवतंय…
त्या अडाणी खाटकाचं म्हणणं… आज मनाला पटतंय…

स्वतःचा स्वार्थ सोडून… इथे लोकांना काहीच दिसत नाही…
माणुसकी नावाचं काही… यांच्या गणितातच बसत नाही…
पैसा असो वा सत्ता… प्रत्येकाला कशाची ना कशाची हाव आहे…
पायाखाली माणसं चिरडणाराच… इथे रयतेचा राव आहे…
न्यायदेवताही डोळ्यावर पट्टी… सत्य दिसू नये म्हणूनच बांधते…
गुन्हेगाराच्या हातातलं… ती रोजंच बोलकं बाहुलं बनते…
गरिबाला जगण्यासाठी… ह्यांचेच पाय धरावे लागतात…
पोटाची खळगी भरायला… कधी कधी स्वतःचेच लचके तोडावे लागतात…
रक्तबंबाळ झालेली मनं… मी जेव्हा पावलोपावली बघतो…
हि माणसंच आहेत ना नक्की…? असा प्रश्न जीवाला पडतो…

एकटं राहून खूप शिकलो… पण या दुनियेची रीत मला जमली नाही…
दुसऱ्याच्या मुखातला घास घ्यायची… माझी हिम्मतच कधी झाली नाही…
पटलंय आता मनाला… हे जग आपल्यासाठी नाही…
माणसं मारून जगायला… या खाटकाच्या पोराला जमणे नाही…
म्हणूनच…
खूप सोसलं रणरणत ऊन… आता मायेच्या सावलीत चाललंय…
घराबाहेर पडलेलं खाटकाचं पोर… आज पुन्हा घराकडे निघालंय…

- टिंग्याची आई

Marathi Kavita : मराठी कविता