Author Topic: अलकाळ गाभणं अन् वांझोटं वाहणं  (Read 427 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
अवकाळ गाभणं अन् वांझोटं वाहणं
*******************************
          (अनिल सा. राऊत 9890884228)
*******************************

खरं खरं सांग पावसा आता तूच मला
या मंत्र्या-संत्र्यांनी किती दिली लाच तुला ?

यायचा येळंवर अन् पिकवून जायचा शेतं
डोळं फाडफाडून बघत राह्यचं लांडगं नेतं !

टाईमाच्या टाईमाला येणं तुझं पक्कं असायचं
तजबीज करताना काळजीचं कारण नसायचं !

जेवढी काळया मायची पोटाची भूक असायची
तेवढीच तुझी दुरडीही 'वरनं' रिती व्हायची !

सगळं कसं आबादी आबाद चाललं होतं
पुढाऱ्याचं पाय धरायचं नशिबी येत नव्हतं !

कुणाची लागली नजर तुझ्या टायमिंगला ?
कुणाच्या 'पार्टीने' तुझा 'तोल' गड्या चालला ?

हवा असतो तेव्हाच पाडतोस दुष्काळ कसा ?
छावणीत गुरांचा 'घास' नेत्यांना 'चारतो' कसा ?

का गड्या वणवण पाण्यापायी दरसाल अशी?
बगळ्या-माफियांची भरतो थैली गच्च कशी?

ओतून घाम कुणबी पीक आणतो जोरात
टपकतो अवकाळी आनंदाच्या ऐन भरात!

करुन सारा सपाराम डोळ्यातल्या सपनांचा
भरतो रांझण नेत्यांचा अन् सरकारी 'बाबूं'चा !

म्हणुन,खरं खरं सांग पावसा आता तूच मला
या मंत्र्या-संत्र्यांनी किती दिली लाच तुला ?

थांबव बाबा आता तुझं हे 'खाबु' वागणं
उगीच अवकाळ गाभणं अन् वांझोटं वाहणं...!

*अनिल सा. राऊत*
9890884228

visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

तळटीप:
प्रतिक्रिया द्यावीच असा जोजार नाही
किंबहुना तसला मला आजार नाही