प्रिय आईस,
तु मेलीस हे तु बरं केलंस....
गेल्या कित्येक वर्षातली आम्हाला तुझी पटलेली एकमेव गोष्ट...
आम्ही तुझ्या मरणाची वाट बघण्याआधिच तु मेलीस
...हे किती छान केलंस.
तसही तुझी मळलेली सुरकुतलेली कातडी
आमच्या दिवाणखानातल्या पडद्यांना म्याचिंग नव्हतीच.
तुझ्या कपड्यांच्या गाठोड्यापेक्षाहि छोटं
शरीरचं मुटकळं घेऊन
पडुन राहीलीही असतीस कोप-यात...
पण नाही बांधुन घेतली आडगळीची खोली,
.....उगाच तुला मोह नको....
जनाची आम्ही कधिच सोडली आणि मनाची ही न ठेवता
टाकलं ही असतं तुला अनाथ आश्रमात...
पण तिथंही पॆसे पडतात
आणि आणखिन एक ई.एम.आय. नकोय आम्हाला...
तु सोडवलंस आम्हाला...
तु मेलीस हे तु बरं केलंस....
आणखिन एक...
तु जन्म दिलास आम्हाला आणि वाढवलंस वॆगेरे...
हे असले काही ऎकवु नकोस...
हिशोब जड जातील तुला !
जनावरं पण आपल्या पिलाला जन्म देतातंच की....
पुनरुत्पादन ह निसर्गाचा नियमंच आहे.
त्यामुळे आमच्यावर उपकार केलेस ह्या भ्रमात राहु नकोस...
आम्ही पण सांभाळलच की तुला..
दोनदा दवाखान्यात पण नेलं होतं.... त्यातल्या एकदा तर हाफ़ डे टाकुन...
तसं तुझ्याकडुन कधी तक्रार ऎकली नाही कसलीच.
म्हणजे सुखातंच असणार तु...
पण तरीही तुला ब-याचदा एकट्यानेच रडताना पाहायलय मी...
पण काही सिरियस नसणार... काही कारणच नाही रडायला...
पण एक सांगु आई...
हल्ली मला पण असंच रडायला येतं...
आणि रडतो एकट्यानीच....
तुझी खुप आठवण येते आणि मग खुप भरून येतं...
तसं झालं काहीच नाहीये पण....
पण...
मुलगा मोठा झालाय माझा
आणि त्याला काही पटतंच नाही माझं....
दिवाणखान्यातले पडदे बदलायचं म्हणतोय....
हरकत नाही माझी....
पण....
पण... आपल्या घरात आडगळीची खोलीच नाहीये गं !
धुंद रवी