हल्ली हे असंच होतं
रात्रीची झोप म्हणजे
छताकडे एकटक पाहणं
आणि डोळ्यातून अश्रुंच वाहणं.
स्वप्नातसुद्धा आजकाल
का कुणी येत नाही,
एकटेपणा तिथेही काही केल्या
पाठ माझी सोडत नाही.
झोपेची आजकाल खरंच
खूपच भिती वाटते,
पर्याय नसतो दुसरा म्हणून
नुसतेच लोळत राहते.
रात्र जुन्या आठवणीत
अशीच हळूहळू ओसरते,
अवचित लागतो डोळा
आणि नेमकी पहाट होते.
कोणाला काही कळू न देता
मनातले मनातच लपवून,
होते मग दिवसाची सुरुवात
चेहऱ्यावर मुखवटा चढवून.
- संतोषी साळस्कर.