आई सांगे बाळा मरणापूर्वी दोन क्षणी,
आयुष्यभर छळले कसे मला सारया जणांनी.
जन्माला मी आले, तेव्हा नाक मुरडले आईने,
तिला हि हवा होता पुरूषाच पोटी जो देईल सुख सर्वार्थाने.
ना दिले प्रेम बाबांनी ना कवटाळले छातीशी,
उरले सुरले अन उष्टेच आले सदा माझ्या वाट्याशी.
स्वप्नातही मांडला नाही खेळ मी भातुकलीचा,
मान दुखली रे माझी भार सोसून हांड्यांचा.
लग्न जेव्हा झाले तेव्हा बाबांस वाटले ते सुटले पाशातून.
तुझ्या बाबांनीही मिरवत आणली जन्मभर ठेवण्या कोंडून.
एका दमात चुरगळले फुलण्याआधीच कळीला,
अन धाक मिळाला त्याच क्षणी, दिवा वंशाचा हवा याच पाळीला.
नियती हि बघ ना कसे पडते कपाळास आठी,
म्हटले ज्याने दुख दिले तो पुरूषच यावा पोटी !!.
रडले स्वताशीच फार पण सावरले त्याच क्षणी,
म्हटले वाचली एक नारी , सुटली जाचातुनी .
.
.
या शेवटच्या क्षणी मला वचन देशील कारे ?
मला न जो भेटला मान तो तू इतरां देशील कारे ?
मरताना आई तुझी मागत आहे काही,
इतके तरी ऋण दुधाचे फेडशील कारे ?
...........अमोल