पावनखिंडीत पावन झालो
पावनखिंडीत पावन झालो जिंकलीच बाजी
बाजी जातो देवाघरती मरणाला राजी ||धृ.||
विशाळगडच्या तोफेसाठी कान अधीर झाले
लाल लाल जरि मान लटकली बोथट झाले भाले
रक्ताच्या थेंबातुन उठतिल लाख लाख बाजी||१||
मान आणखी इमान अमुचे शिवबाच्या चरणी
स्वर्ग लाभतो धारातीर्थी लय लागे मरणी
चतुर शिवाजी साठी लावू मरणाशी बाजी||२||
तोफ उडाली हास्य लाल ते मुखावरी फुलले
सुटले राजे सुटलो मीही कलेवरही हसले
भाग्यशाली हे मरण आमुचे मला लाभले आजी||३||
---------------------- ------ Anonymous