तळावलेल्या वाळवंटाला निळ्या आभाळाची साथ
वाळूतील वाफांच्या हाती शांत आभाळाचा हात.
वारा हळू फुंकर घाले, वाळू हळू निवे,
उष्ण वाफेत दाटली अनंत आसवे.
आत साठवता न ये, कुणा सांगता ही न ये,
हृदयाची तळमळ कुणाही का समजू नये?
काय करावे कळेना, होत राही घालमेल,
बोचतच राही सदा खोल मनातला सल.
शांत स्वरात आभाळ समजावे मातीला
आधाराची जेव्हा खरी गरज असते तिला.
रात्र अशी सरून जाई, शांत होई वाळू,
तापलेले अंतःकरण विसावते हळू.
पुन्हा नव्या दिवसची नवी सुरुवात
तीच हुरहुर पुन्हा वाळूच्या उरात.