नकळत पापणी आज अश्रूंनी भिजली
डोळ्यांची तहान आज अश्रूंनी भागली
गुलाबाच्या पायघड्यांवरून मन स्वप्नांत पोहोचते
काट्याची वेदना तरीही हृदयात बोचते
उरातील आग आज अश्रूंनी विझली
डोळ्यांची तहान आज अश्रूंनी भागली
भरतीलाही आज कोरडा किनारा
भरल्या आभाळी नाही चंद्राला निवारा
अश्रूंच्या मोत्यांनी आज चांदणी सजली
डोळ्यांची तहान आज अश्रूंनी भागली
रोपट्याला आज नवी कळी उमलली
घरट्यात पाखरे शांत निजलेली
वादळाची एक फुंकर आज सार्यांनी भोगली
डोळ्यांची तहान आज अश्रूंनी भागली