Author Topic: या सगळ्या पसाऱ्यामधून  (Read 1106 times)

Offline phatak.sujit

  • Newbie
  • *
  • Posts: 13
या सगळ्या पसाऱ्यामधून
एकदा स्वत:ला गाठून
सगळ्यांच्या कव्हरेज एरियाबाहेर;
जिथे तुझे फोटो आठवणार नाहीत-
तिथे बसून
थोडा रडून घेईन म्हणतो
खोल श्वास घेईन म्हणतो
 
 
सगळी मतं, माझं सगळं एकटेपण, सगळ्या इच्छा
जे गुंतून पडलंय जगण्यामध्ये
ते सगळं मोकळं करेन म्हणतो.
तुझं तुला, त्याचं त्याला,
ज्याचं त्याचं ज्याला त्याला
देऊन टाकेन,
हलकं होण्याचा प्रयत्न तरी करून बघेन.
 
 
नेहमीचं होऊन गेलंय हे फुटणं,
हे भरून येणं, हे एकट्यामध्ये मोकळं होणं.
या सगळ्यासाठी एकदा जन्माला माफ करेन म्हणतो.
आणि ह्या नेहमीच्यामध्ये अडकत चाल्लेल्या,
गुंतत चाल्लेल्या, फसत चाल्लेल्या,
समजुतदारपणे हसत चाल्लेल्या मला
’मानलं तुला’ म्हणत
नमस्कार करेन म्हणतो...!
 
 
या सगळ्या पसाऱ्यामधून
एकदा स्वत:ला गाठून
सगळ्यांच्या कव्हरेज एरियाबाहेर;
जिथे तुझे फोटो आठवणार नाहीत...
 
 
-सुजीत