(१)
मित्रा,
आता मी ही तेवढा लहान नाही उरलोय, आणि
तू ही तेवढा मोठा नाही राहिलायस.
(२)
मित्रा,
तुझे मित्र
तुझी स्टाईल
तुझं लाईफ
तुझं सिंपल असणं
तुझं कूल असणं
इझी गोइन असणं
माझा श्वास कोंडतंय;
गुदमरल्यासारखं होतंय
(३)
दोस्त,
तुला ’वाटत’ नाही, आणि
मी ’बोलत’ नाही
तोपर्यंतचाच आहे आपला प्रवास.
(४)
...हाहा!
आणि मी बोलत नाही पण
अपरात्री उठून कविता लिहितो,
तेव्हा तू काय करत असतोस, दोस्त?
(५)
दोस्त,
तुझ्या शरिराचा, केसांचा वास
आणि तुझे फेसबुक अपडेट्स
मॅच नाही होतयत.
(६)
’दोस्त?’
’हॅलो?’
’दोस्त!’
’हॅलो? हॅ...लो?’
’ऐकू येतंय का? हॅलो?’
’मित्रा...हॅलो?’
(आवाज वाढवून) ’हॅलो? हॅलो?’
(लाऊडर) ’ऐकू येतंय का?’
खरखर खरखर खरखर
बिपबिप बिपबिप
---------
शांतता---------
----------
’शिट...’
(७)
दोस्ता,
मी कुणाला सांगू की
’मी अजूनही कविता करतो’?
तू माझा पेद्रू अंकल नाहीयेस आणि
स्विनी सुध्दा.
(८)
’दोस्त, अल्विदा...’
असा शेवट करायचा
मोह होतोय दोस्त...!
पण...!
आता मी ही तेवढा लहान नाही उरलोय, आणि
तू ही तेवढा मोठा नाही राहिलायस.
-सुजीत