तुझी आज मनःस्थिती..
अशी द्विधा का??
का तू अशी आज संभ्रमात?
नको ना ग पडू या नात्यांच्या खोट्या बंधनात,
येऊ दे ना मला तुझ्या जगात..
मलाही डोळे किल्किले करून ..
पाहूदे ना हे जग..
अनुभवू दे ना,
प्रकाश अन् आकाश..
वारा अन् पाऊस,
उन्ह अन् सावल्या..
तुझ्या कुशीतला स्वर्ग,
तुझी ऊब..
घे ना मला तुझ्या मिठीत..
एवढे दिवस ज्या केल्या गुजगोष्टी,
सगळं विसरलीस?
आजच तुला कळलं ना..
मी दिवटी आहे..
तुमच्या वंशाचा दिवा नाही,
म्हणून मग..
या सगळ्यांसाठी तू मला नाकारतेयस??
आठव ना गं..
तूही एक स्त्री आहेस,
मग का टाहो फोडतेयस?
घे ना ठाम निर्णय,
स्वीकार ना मला ..
मिणमिणती पणती होईन मी
वंशाचा दिवा नाही बनले तरी..
तुझा जीवही तूटतोय ना गं???
तुझ्याच उदरी,
नाळेशी जोड्लेय ना गं..
तुझाच जीवनरस पितेय..
माहीत आहे खडतर आहे वाट ,
खूप सोसावं लागेल तुला..
क्षणो़क्षणी घाव पडतील वर्मी,
एकटीचाच असेल रस्ता..
असं तुला वटत असेल,
पण...
चालू ना आपण दोघी सोबत,,..
घे ना मला कवेत,
उडून जाऊ दोघी ..
स्वप्नांच्या जगात...
-- जयश्री