या आपल्या भारत देशात शेतकऱ्यांच्या समस्येकडे सरकारने जरा डोळे नीट उघडून बघितले पाहिजे. त्यातल्याच एका गरीब शेतकर्याची संवेदना मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे .
दूर वर डोंगर
साजिर गोजिरं,
वारा गार गार,
काटा येई अंगावर!
मिणमिणत्या डोळ्यांना ,
अंधाराची सोय नाही,
फाटक्या झोपडीला,
कसलंच दार नाही!
उनमून वाकळ,
अंगावर घेता,
जाई उडून उडून,
जसा वारा आत येई !
चूल मोकळी मोकळी
लय झालं सरपण ,
महाग जगणं र बाबा
स्वस्त झालया मरण!
माठातलं पाणी,
रातीचा आधार,
डोळ्यात पाणी पाणी,
अन जीवघेणा अंधार!
तग धर माज्या बाळा,
व्हईल सकाळ,
निजवते लाडी लाडी,
माझं गुनाच रं बाळ!
रोज रोज रात येई,
रोज हिच अंगाई,
पोरं निजती रडून,
मायबाप कळवळून जाई!
एक दिस असा आला,
एक गलबला झाला,
संसार झोपडीतला ,
कायमचा निजून गेला!
कटू सत्य जन्माचं,
असे किती संसार
उपाशीच राती
निजे गपगार !!!
मैत्रेय (अमोल कांबळे)