एखाद्या आषाढी एकादशीला
दर्शन देऊन देऊन थकून गेलेला विठू
जेव्हा पाहत असेल वाकून
झिजत जाणाऱ्या आपल्याच पायांना
तेव्हा त्याचाही ऊर भरून येत असेल
मग तो अपार व्याकुळ होऊन
न्याहळत असेल भक्तीचा महापूर
ऐकत असेल ... टाळांची किणकिण
... मृदंगाचे बोल
... अभंगाची धून
नंतर त्यागून दगडी शरीर
तो निघून येत असेल मंदिराबाहेर
... लाऊन बुक्का
... वाजवीत टाळ
... स्वतःचंच नाव घेत
फिरत असेल गर्दीतून
भक्तांचं दर्शन घेत
मग स्वतःच्याच दर्शनरांगेत उभं राहून
सरकत असेल हळूहळू गाभाऱ्याकडे
नि विचारतही असेल प्रत्येकाला
' माऊली देव कुठे असतो ' म्हणून
तेव्हा गाभाऱ्यात आल्यावर
निष्प्राण दगडाच्या मूर्तीकडे बोट करून
त्याला सांगत असेल कुणीतरी
की ' नवख्या तो तिथे असतो देव ' म्हणून
मग तो ' जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले ' गुणगुणत
परतत असेल गर्दीतून
आपण गेली किती युगे उभे आहोत इथे
आणि आणखीन किती युगे उभे राहू इथेच
याचं गणित करीत
जाऊन उभा ठाकत असेल
आपल्याच मूळ जागेवर
... अगदी निराश होऊन
झिजत जाणारे स्वतःचेच पाय बघत
तटस्त मैलाच्या दगडासारखा ..
तटस्त मैलाच्या दगडासारखा ...
गजानन मुळे
mulegajanan57@gmail.com