अपुरे, अधुरे, निस्तेज,
ओथंबलेले आणि अचेतन शब्द,
स्पर्शच अधिक जिवन्त, धमन्यांपर्यत पोचणारे,
पण तेही क्षणिक, मनाला सुखावुन मग एकटेच सोडणारे..
डोळे अधिकच बोलके आणि आसवांची तर नशाच वेगळी,
गालांवरून वाहताना मात्र तेही शेवटी केविलवाणे..
कापरे भरतात आणि साथ देतात वेड्या वाकड्या श्वासांना,
मनाचे खेळ चालतात बगल देण्याचे त्या विचारांच्या चाहुलींना,
की भेट ही शेवटचीच आपली कदाचित...
सुटते मिठी, अश्रु पुसले जातात,
व्यवहार जिंकतो नेहमीप्रमाणेच आणि वाटा वेगळ्या होतात...
नाहीच मिळत त्या परत बरेचदा, दुरूनच बघतात चोरुन कधी उत्सुकतेने,
कधी शरमेने..
कधीतरी भीतीचा पडदा सारून धीर करुन जवळही येतात..
पण हिरमुसलेले बंध जुने,
असंख्य धागे त्यांना विस्कटलेल्या नात्यांचे..
स्पर्श, शब्द, डोळे आणि श्वास,
आता कोणीच कोणाला बधत नाही...
किती मिठ्या मारल्या तरीही,
भेट काही घडत नाही
~ अमित आदि