दुष्काळ
केले पावसाने काळे
आणू कुठून मी पाणी
नद्या ओहळ आटले
झाली धरणे निकामी
येता येईना पाऊस
मावळली आशा सारी
काय वाढले पुढ्यात
काही कळतच नाही
ज्योतिष्यांची काळी तोंडे
सांगतात काही बाही
असा विपरीत काळ
कधी पाहिलाच नाही
गेली झाडे ही सुकून
गुरांनाही चारा नाही
मारी वासरू ढुसण्या
आचळाला पान्हा नाही
करपले शेत माझे
आता काय करू तरी
घरातही नाही अन्न
आली उपासाची पाळी
अन्नासाठी दाही दिशा
हिंडलो मी दारोदारी
सा-यांचीच तिच दशा
झाले सारेच भिकारी
चिल्लीपिल्ली मेली माझी
होती उपाशी बिचारी
फिरविले डोळे त्यांनी
माझ्या याच मांडीवरी
फाटले काळीज माझे
काय करू जगून मी
डोळे पाण्याने भरले
तरी घागर रिकामी
माझी घागर रिकामी
अन् घागर रिकामी
--- लबाड बोका