मी शब्दांचा बहर आणलाय
काव्याची मैफिल जमलीय समजून
करुन दिला असता माझा परिचय,
पण कुठे ओळखलंय मी मला अजून
खरं तर माझी खरी ओळख
माझ्या काव्यातून उलगडेल
एखादं नाजूक मोरपिस अलगद
तुमच्या रसिक मनावर बागडेल
स्पर्श त्याचा असा अनुभवालं
जो कधीच बोचणार नाही
बोचलाच, तरी चुकनही
वेदना मनापर्यंत पोचणार नाही
म्हणुनच भावनांच्या असंख्य चांदण्यांची
तूमच्यासाठी खास माळ विणली आहे
आणि कवितांची काही फुले नाही
मी अख्खी बागचं आणली आहे
एक विनंती
तुमच्या कवि मनाशी जुळेल असा
नाजुक बंधनाचा धागा द्या
जास्त नाही मनाच्या कोपऱ्यातचं
पण आपुलकीनं थोडी जागा द्या
तसंमाझ्या नजरेतून न्याहाळा
प्रेमाचं विश्व किती सुंदर आहे
फुलांची तशी सारेच कदर करतात
पण इथे काट्यांचाही आदर आहे
खरं तरमाझ्याही जिवनात उजेड आहे
कधी अंधार उजेडाला पुसत नाही
पण धुकं इतकं पसरलय,
शेवटी काहीचं दिसत नाही
शेवटीअसं काय मी आणंल इथे
जे इथलं मी घेऊन जाणार आहे
पण कविताच्या बिजातून तुमच्या मनात
पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहे
आणि जाता जाता
वाटतं जोपर्यंत जगीन, तोपर्यंत
कोणाचाच माझ्यावर आरोप नसावा
फक्त कवितांची विभूती मागे ठेवून
उदबत्ती सारखा निरोप असावा
@ सनिल पांगे