मराठी साहित्य विश्वाला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांचे आज सकाळी निधन झाले.
कविता बालसाहित्य तसेच अनुवादित साहित्य अशा अनेक साहित्यप्रकारात सहजपणे आणि मुक्तपणे संचार करणारा एक अवलिया...गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले. त्यांच्या ‘अष्टदर्शने ’ या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन २००३ साली गौरवण्यात आले होते. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे साहित्यिक ठरले. विंदांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवण गावचा... आणि शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले.त्यांनी पूर्ण लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. विंदानी मराठी काव्यात विविध घाटाच्या वैचारीक, काव्यलेखनाने भर घातली. मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामान्यापर्यंत पोहचेल असे पाहीले.
विंदांचे साहित्य-
स्वेदगंगा , मृद्गंध , धृपद , जातक , विरूपिका , अष्टदर्शने (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार) असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह गाजले.
त्याशिवाय
संहिता , आदिमाया या संकलित काव्यसंग्रहासाठीही त्यांनी योगदान दिले.
विंदांच्या बालकविता खूपच गाजल्या.
राणीची बाग , एकदा काय झाले , सशाचे कान , एटू लोकांचा देश , परी ग परी , अजबखाना , सर्कसवाला ,
पिशीमावशी आणि तिची भुतावळ , अडम् तडम् , टॉप ,
सात एके सात , बागुलबोवा... अशा बालसाहित्यातून त्यांनी बालगोपालांचे मनोरंजन केले.
ललित निबंध
स्पर्शाची पालवी , आकाशाचा अर्थ , करंदीकरांचे समग्र लघुनिबंध
समीक्षा
परंपरा आणि नवता , उद्गार
अनुवाद
ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र , फाउस्ट , राजा लिअर
अर्वाचीनीकरण
संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर
इंग्रजी समीक्षा
लिटरेचर ऍज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१), अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)
... आत्माही तोच तो ;
हत्याही तीच ती!
कारण जीवनही तेच ते!
आणि मरणही तेच ते!
या ख-या अर्थाने जीवन जगलेल्या महान साहित्यिकाला माझे शतशः प्रणाम.... विंदा तुम्ही आमच्यात असणार आहात... तुमच्या रचनांमधून...तुमच्या लेखांमधून... तुम्ही अजरामर आहात...