पावसाच्या चिंबपणातून
उन्हाच्या काहीलीतुन
कुडकुडणाऱ्या थंडीतून
बहरत असते कविता
आठवणींच्या गाठोड्यातून
जगण्याच्या रखरखीतून
अनुभवाच्या संचितातून
जन्म घेते कविता
निसर्गाच्या चैतन्यातून
स्मशानातल्या राखेतून
तलावातल्या गाळातून
रुप घेते कविता
अश्रूंच्या वहनातून
प्रेमाच्या वर्षावातून
नात्यांच्या बंधनातून
वाढत असते कविता
गरीबाच्या झोपडीतून
रस्त्यालगतच्या दारिद्र्यातून
आदिवासी पाड्यांमधून
उमलत असते कविता
खवळलेल्या समुद्रातून
शांत वाहणाऱ्या नदीतून
कोसळणाऱ्या धबधब्यातून
न्हाऊन निघते कविता
शुभ्र हिमपर्वतांमधून
वाळवंटाच्या रुक्षतेमधून
फुललेल्या माळांवरुन
निपजत असते कविता
अध्यात्माच्या पोथीतून
इतिहासाच्या वर्णनातून
वृत्तपत्रांच्या रकान्यातून
बाळसे धरते कविता
घुसमटलेल्या भावनांना
सलणाऱ्या वेदनेला
सैरभैर अस्वस्थतेला
वाट करून देते कविता