***** तो तर गेला *****
================
ज्याच्या भरवश्यावर आले होते माहेर सोडून
ज्याच्यावर टाकले होते आयुष्य ओवाळून
तो त्याच्याच मस्तीत जगलां
चांगली नोकरी असूनही दारूच्या आहारी जाऊन
मला एकटाच सोडून गेला .........
तो गेला तेव्हा
उभं आयुष्य डोळ्यासमोर तरळत होतं
मन काळोखानं पूर्ण झाकोळलेलं
पण पदरात दोन मुलं असल्यानं
सामोरं जावचं लागणारं होतं आयुष्याला
नोकरी असल्यानं प्रश्न नव्हता पोटाचा
दिवस तर भुर्रकन उडून जायचां
पण रात्र अंगावर यायची
कां केला नाही त्यानं माझा विचार
हा प्रश्न मनातं घोळत रहायचां
काही दिवसांतच निजलेल्या भावनांनी
डोकं वर काढायला सुरवात केली
अन मन पुन्हा झुरू लागलं
कुणाच्या तरी स्पर्शासाठी
प्रत्येकाच्या नजरेत पहात होते मी
मला आधार देण्याची धडपड
कारण मी जिवंत आहे अन माझ्या भावनाही
याची त्यांना पूर्ण जाणीव होती
तेव्हा सतीची प्रथा असती तर
हा विचारही मनात डोकावून गेलां
मी हि किती दिवस तग धरणार होते
कारण मन अन शरीर यांची प्रेमाची गरज
स्वस्थ बसू देत नव्हती
पण समाज नावाची मोठी भिंत दिसत होती डोळ्यासमोर
हा समाजही किती बेगडी आहे नां
मी शोधलेलं माझं सुख कसं कुणाला मानवणारं
तरी बिचकत दचकत लपवत मी शोधलंय माझं सुख
कारण तो तर गेला
अन मी बघतेय नां याच समाजात सुखी असलेल्यांना
सुख अजून ओरबडतांना .
=====================================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २३ . ११ .१३