प्रिय सखीच्या स्मरणासाठी
शहाजहानने ताज बांधला
अमर पाहुनि प्रेम तयाचे
नांवाजताती सर्वच त्याला ।
जिवंत असतां सखी परंतु
कुणा न प्रेम त्याचे दिसले
मला वाटते प्रेम तयाचे
ताजमहलने अमर केले ।
वरवरच्या देखाव्याला
आजही जाती लोक भुलोनि
ऐकले-पाहिले नसले तरी
प्रेम सांगति वर्णन करुनि ।
पुरविण्यास्तव जिद्द मनाची
वेठीला धरले जनतेला
रक्त शोषून गरीबांचे तें
पत्नीसाठीं महल बांधला ।
नाजुक नक्षी पाहून त्याची
लोक भान विसरुनि जाती
हात तोडले कामकरयांचे
नक्षीत तें त्या मला दिसती ।
शुभ्र रंगात दिसून येते
पावित्र्य आचार विचारांचे
ताजमहलच्या संगमरवरी
डाग मज दिसती रक्ताचे ।
लोक ऐकती सूर प्रीतिचे
निर्जीव त्या वास्तुमधुनि
करुण किंकाळ्या ऐकू येति
मला त्या दगडांदगडां मधुनि ।
ऐकून ती प्रेम कहाणी
सत्यकटु झांकुनि जाते
वरच्या देखाव्या भुलूनी जनता
अमरपणाची गाणी गाते ।
प्रेम आहे एक अनुभूती
दाखविता ती येत नाहीं
बांधुनि वाडे-महाल ती
साकार कधीं होत नाहीं ।
म्हणुनि ताजची ऐकुनि गाथा
त्यात न-मला अभिमान वाटतो
अमर प्रीतिचा परंतु त्यांत
सदा मला अपमान वाटतो । ।रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/miscellaneous_29.html (http://www.kaviravi.com/2013/06/miscellaneous_29.html)