वृत्त : आनंदकंद
लगावली : गागाल गालगागा / गागाल गालगागा
प्रस्थापितांस सार्या मी फाडतोय हल्ली
रद्दी किलोकिलोची मी मोजतोय हल्ली
भिंती मधे घराच्या गेली हयात ज्याची
गझलेत वादळाला तो बांधतोय हल्ली
शकले कधी न झाली प्रेमात काळजाची
मतल्यात दर्द त्याच्या तो ओततोय हल्ली
घोकून वृत्त मात्रा पांडित्य लाभले पण
आयुष्य व्यर्थ गेले तो जाणतोय हल्ली
झाले महान येथे माझ्याच कौतुकाने
उल्लेख फार त्यांचा मी टाळतोय हल्ली
''आयुष्य मांडतो मी'' खोटेच सांगतो अन
योजून शेर येथे तो पोस्टतोय हल्ली
खुंटीस टांगुनीया केदार जानव्याला
ब्राह्मण्य या युगाचे तो पेलतोय हल्ली
केदार लाख तारे जमले नवे क्षितीजी
तार्यांत सूर्य माझा मी शोधतोय हल्ली
केदार...
छान केदार !!!