जीवन प्रवाही असायला हवं
=====================
झुळझुळ वहाणाऱ्या पाण्याला तरी
कुठे असतो मार्ग मोकळा
असंख्य दगड , धोंडे , यांना पार करत
खडकांवर आपटूनही
पुन्हा माघारी येत वेगळा मार्ग शोधत
ते पुन्हा वाहू लागतं शीळ घालतं
जीवनही असंच प्रवाही असायला हवं
जगायचंय तर अडचणी तर येणारच
काही नैसर्गिक काही मानवनिर्मित
त्याला तोंड देत देत
त्यातून मार्ग काढत चालायला हवं
असंख्य काटे आले मार्गात
डोंगर उभे होते मार्गावर
तरी मानवानं त्यांना भेदून मार्ग काढलाच नां
तसंच कुठल्याही प्रसंगी मार्ग काढून
जगण्याला नवी दिशा देणं जमायला हवं
त्यासाठी जगण्याची उर्मी कणखर मन हवं
मरणाला स्वतःहून आपलं करणं
हे तर असतं खूपच सोप्पं
पण जगण्याला सामोरं जाणं
हेच माणसाचं लक्षण असायला हवं
जो न डगमगता गाठतो किनारा
त्यालाच वाटत जीवन हवं
त्यालाच भेटत जगणं नवं
==========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ७.४.१४ वेळ : ६.२० स.