एक काळ असा होता,
नाटकातला तो फक्त मुखवटा होता
प्रयोग संपताच कोपर्-यात तो,
अडगळ बनून राहत होता
माणूस तेव्हा माणूस होता
माणसाला तेव्हा चेहरा होता
मुखवटा केवळ मनोरंजनासाठी होता
पाठांतर आम्हास लागत नाही,
प्रॉम्पटरची जराही गरज नाही
घडाघडा खोटं बोलण्यात चोरीच नाही
एकांती; आरशासमोर सुद्धा,
मुखवटा आमचा उतरत नाही
भेटतो आम्ही आज एकामेकांना
रंगीततालीम अंगवळणी आम्हाला
"हे विश्वच माझे रंगमंच"; शेक्सपिअर म्हणाला,
अर्थ भलताच लागला आम्हाला
३६५ दिवस प्रयोग आमचा,
उतरवता मुखवटा येतो हुंदका
सत्य सहन आम्हास होत नाही,
मुखवट्याविना आता राहवत नाही
आज मुखवट्यांचे थर चढलेत,
चेहरे आता दुर्मिळ झालेत
चूका आमच्या संपत नाहीत,
मुखवट्यांचे थर काही उतरत नाहीत
वाट बघतोय बोलण्यासाठी,
मुखवट्याखालील चेहर्-यांची
शंकानिरसन करण्यासाठी,
माझा मुखवटा उतरवणार्-यांची