नको रे माझ्या मना
आता नको वाट पाहू
नको आता आणखी साहू
नको वेड्या आशेत राहू ॥
नको कुणासाठी झुरणे
व्यर्थ ठरे हुरहुरणे
नको कुणासाठी मरणे
नको उगा काही करणे ॥
नको मनाला ती आशा
नको पांगळी निराशा
नाही साहवत आता
मनाची ही दशा ॥
का रे मना गुंततो तु
काही क्षणातच कोठे
गुंता सोडताना व्यथा
किती होतात येथे ॥
काल कोण तुझे होते
आज कोण झाले तुझे
तुझे माझे सोडून दे रे
उद्या कोण आहे तुझे? ॥
तुझी वेदना रे मना
नाही कळणार कुणा
नको वाटू देऊ उण्या
सुप्त मनीच्या त्या खुणा ॥
तुझ्या "प्रामाणिकपणाच्या
आयचा घो" केला कुणी
नको वेदना ती उरी
नको डोळ्यामधी पाणी ॥
नको नशिबाला दोष
नको कुणा दोषारोप
नाही कुणी दोषी येथे
नको तुझ्या मना त्रास ॥
उषा कितीक होतील
निशा कितीक जातील
मनी तुझ्या लालीमा
किती वेळ ठेवशील? ॥
किती मना समजावू
दे रे सोडून तो नाद
नको कान टवकारु
कुणी देणार नाही साद ॥
उमलत्या या कळिची
येथे हत्या केली कुणी
कोणा मानावे साक्षीदार
आणि कोणा आरोपी ॥
नको सुखाचा उमाळा
नको दु:खाची गुंफण
खरे वास्तव सोडून
नको रंगवू तू स्वप्न ॥
सुखस्वप्ने मनीची ती
कधी झाली का पुरी?
दे ना सोडून त्यांना
का कवटाळतो उरी ॥
किती जमा करशील
तुझ्या मनाच्या तुकड्यांना
किती वेळा जोडशील
भावनांच्या साखळ्यांना ॥
माझ्या मना सांग
कोण तुला समजावणार
कुणाचे नाही कोणी येथे
कधी तुला कळणार? ॥
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com