देव खातो शेव
(९ डिसेंबर १९९० च्या लोकसत्ता 'किशोरकुंज' मध्यें प्रकाशित)
बंडूने एकदा देवापुढे
नैवेद्य म्हणून ठेवला शेव
आणि खरंच तिथल्या तिथे
प्रकट की हो झाला देव
म्हणाला "लौकर वर माग
चुकेल माझी फ़ास्ट ट्रेन"
बंडूला काही सुचेचना
सुन्न झाला त्याचा ब्रेन
तेवढ्यात त्याचे चालले डोके
कल्पना सुचली त्याला झ्याक
"आठवड्यातले कामाचे दिवस"
म्हणाला "देवा काढूनच टाक
रोज असू दे रविवार
अभ्यासाची कटकट नको
शाळेसाठी रोज सकाळी
झोप मोडून उठणे नको
मस्तपैकी झोपा काढेन
उठेन सकाळी दहा वाजता
आणखी तासभर लोळत राहीन
किशोरकुंज वाचता वाचता "
अंतर्धान पावला देव
हळूच म्हणून "तथास्तु"
आई म्हणाली हलवून "बंड्या,
झोपेत कां रे हसतोयस तू?"
superrrb
mast