एक दिवस ऐसाही यावा,
अवनीला सुंदर करणारा.
रंग-स्थळांचे अंतर कापुन,
तुटलेले अंतर शिवणारा.
मुल्लाने मग गावी गीता,
नमाज व्हावी शिवालायातून.
क्रुसाभोवती वेद घुमावा,
बुद्ध हसावा, घरा-घरातून.
रेष पुसावी नकाशातली.
तुटून जाव्या कुंपणतारा.
कुणी कुणाचा रिपु नसावा,
जुळून येवो साऱ्या तारा.
परदुखाने ऐश्या दिवशी,
माझेही अंतर सोलावे.
समोरच्याच्या अधरावरती,
मजला माझे हास्य मिळावे.
एक दिवस ऐसाही यावा,
अणु-रेणुचा अर्थ कळावा.
मातीमधले गुज कळावे,
देहाचा या बंध सुटावा.
-शार्दुल